माझ्याविषयी (२)
Submitted by विवेक on Tue, 02/03/2009 - 22:01
दहावी मधे विशेष गुण मिळवल्यामुळे मला शाळेत नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. त्याकाळी म्हणजे १९७५ साली वर्षाला ५०० रुपये मिळाले होते. या रुपयांतून मी एक इलेक्ट्रिक गिटार विकत घेतली. पण त्यात कोणतंही शिक्षण न घेता स्वत:च्या मनानेच शिकलो. काही मित्र हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा करायचे त्यांच्या समूहात दाखल झालो. दोन तीन शोज वाजवले. पण नंतर माझा गिटार मधला रस कमी झाला. सीए ची उमेदवारी करताना फिरतीच्या कामांमुळे त्यातही व्यत्यय आला. मेंडोलिनही गिटार आल्यामुळे सुटलं असावं. आज ही सगळी वाद्य कुठे आहेत हा एक शोधाचाच विषय ठरावा. नंतर माझा संबंध आला तो हार्मोनियमशी. हार्मोनियम मी वाजवायला लागलो तोही अपघातानेच. माझी आतेबहीण शास्त्रीय संगीत शिकलेली आणि नियमित रियाज करायची. तिला तबल्याची साथ माझा आतेभाऊच करत असे. शास्त्रीय संगीताची गोडी असल्याने बहिणीचा रियाज मी नियमितपणे ऎकायला जात असे. सुरुवातीला माझी भूमिका श्रोत्याचीच असायची. पण नंतर नंतर ते कठीण होऊ लागलं. आपलाही काहीतरी सहभाग असला पाहिजे असं वाटायला लागलं. मग विचार आला की आपण पेटीची साथ करावी का ? मग सुरुवातीला चाचपडत चाचपडत साथ करायला सुरुवात केली. स्वरज्ञान तर पक्क होतंच, पण पेटीचं तंत्र माहित नव्हतं आणि बोटं फिरत नसत. पण सरावाने त्यावरही मात केली आणि मी बर्यापैकी साथ करु लागलो. यातून आधीच तयार झालेला कान अजूनच पक्का झाला, कारण साथ करणार्याला सदैव जागरुक राहून गायक काय गातोय ते तसंच्या तसं वाजवायचं असतं. शिवाय गायक मधेच विश्रांती घेईल तेंव्हा स्वत:चा स्वराविष्कारही दाखवायचा असतो. हे चालू असताना मी हिंदी चित्रपट संगीताचा पाठपुरावा सोडला नाही. माझा एक चुलत भाऊ छान हिंदी गाणी म्हणायचा. चाळीत गणपती मधे कार्यक्रम व्हायचे. तिथे गुणदर्शनाची संधी मिळायची. मग हळूहळू बाहेरुन घरगुती कार्यक्रमांची बोलावणी यायला लागली. अर्थात अशा कार्यक्रमात मी तबला, ढोलकी, गिटार वगैरेच वाजवत असे. एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतंय की मी शाळेत आणि कॉलेजमधे शिकत असताना एकदाही स्टेजवरुन माझी कला सादर केली नाही. हा बहुतेक माझ्या त्यावेळच्या लाजर्या स्वभावाचाच एक भाग असावा.
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 539 reads