माझ्याविषयी (३)
Submitted by विवेक on Tue, 02/03/2009 - 22:15
पुढे १९८४ साली मी सीए झालो. मधे ६-७ वर्ष संगीताशी फारकत घेतल्यासारखीच झाली होती. नुसतीच श्रवणभक्ती चालू असायची. पण कुंडलीत नंतर परत संगीताकडे वळण्याचा योग असावा. कसा ते ऎका. १९८७ साली मी मुंबईच्या प्रभादेवी इथल्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापकी करायला सुरुवात केली. या लेक्चरबाजीमुळे अंगात जन्मापासून मुरलेला लाजरे-बुजरेपणा हळूहळू दूर व्हायला लागला होता. माझ्या आठवणी प्रमाणे ९३-९४ साली आमच्या महाविद्यालयातल्या एका प्राध्यापकाने एक संगीत कार्यक्रम सादर करायचा किडा सोडला. कार्यक्रमाची संकल्पना छान होती. मालकंस रागातली हिंदी व मराठी गाणी सादर करायची व त्याला प्रबोधनात्मक निवेदनाची जोड द्यायची अशी संकल्पना होती. कार्यक्रम फक्त प्राध्यापकांचाच व प्राध्यापकांसाठीच होता. मग कलाकारांची शोध मोहीम सुरु झाली. स्टाफरुम मधे चर्चा सुरु झाली. या कार्यक्रमाची संकल्पना ऎकूनच माझा शास्त्रीय संगीताशी असलेला घनिष्ट संबंध मला स्वस्थ बसू देईना. मग मी तबला वाजवू शकतो असा गौप्यस्फोट केला आणि कार्यक्रमाच्या चमूमधे शिरकाव केला. उत्तम पेटी वाजवणारे एक प्राध्यापकही मिळाले. मग काय तयार झाला आमचा वाद्यवृंद. गाणारे मात्र हौशीच होते. आणि यातूनच स्फूर्ती घेऊन मी विचार केला की आपणही नरडं साफ करुन घ्यावं. मग मीही एक गाणं सादर करण्याची कल्पना मांडली, पण गाण्याचा आधीचा अनुभव शून्य म्हणून एका प्राध्यापिकेबरोबर युगल गीत गाण्याचं ठरवलं. (म्हटलं काही चुकलं तर खापर एकट्यावरच नको). या गाण्याची सर्वांनी प्रशंसा केल्यावर हिम्मत आणखी वाढली. पुढे पुलंच्या विविध गुणांवर झोत टाकणारा कार्यक्रम करायचं ठरलं. यावेळेस सुद्धा कार्यक्रम प्राध्यापकांनीच करायचा होता पण श्रोत्यांमधे विद्यार्थीगणही होते. त्यामुळे थोड्या अधिक हिमतीची आवश्यकता होती. या कार्यक्रमात मी जिंतेंद्र अभिषेकींनी गायलेलं पुलंचं संगीत असलेलं "शब्दावाचुनी कळले सारे, शब्दांच्या पलिकडले" हे गाणं सादर केलं. त्यालाही वाहवा मिळाली. यातूनच पुढे आमच्या मुख्याध्यापकांनी "प्रोफेसर इन चार्ज - कल्चरल अफेअर्स" पदाची जबाबदारी गळ्यात टाकली जी मी चार वर्ष सांभाळली आणि तीदेखील पूर्णपणे झोकून देऊन. या पदामुळे मला वर्षभरातले विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बसवणे, ते विविध स्पर्धांमधे सादर करणे, तसेच वार्षिक कार्यक्रमातला ऑर्केस्ट्रा विद्यार्थ्यांकडून बसवून घेणे हे सगळे उद्योग करण्याची संधी मिळाली. यातून रंगभूमीचीही थोडीफार ओळख झाली, शिवाय मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यातली काही कौशल्ये पदरात पडली, लोकसंग्रह वाढला, बुजरेपणा कमी झाला असे अनेक फायदे झाले. प्राध्यापकीच्या काळात सर्वात मोठा झालेला फायदा म्हणजे मी गाऊ शकतो हा लागलेला शोध. आजही मी कोणाला सांगतो की मी गळा प्रथम उघडला तो वयाची पस्तीशी जवळ आल्यावर तेंव्हा त्यांचा विश्वास बसत नाही. थोडक्यात काय तर काहीही नवीन करण्यासाठी "आता माझं वय झालंय" ही सबब सांगण्यात काही अर्थच नाही. आजतागायत मी नवीन नवीन गोष्टी शिकतोच आहे याचा प्रत्यय तुम्हाला पुढचं वाचून येईलच.
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 261 reads