माझ्याविषयी (४)

कॉलेजमधल्या गाण्याच्या प्रयोगाने हळूहळू मी घरगुती मैफिलींमधेही दोन-चार गाणी गाऊन नरडं साफ करुन घ्यायचो. तेवढीच तबला वादनातून विश्रांतीही मिळायची. हळूहळू मी स्वत: गाताना पेटी हातात घेऊन गायचा सराव करु लागलो. पण हे प्रकरण मात्र काही जमेना. गाताना पेटी वाजवायला गेलो तर गाण्यातलं लक्ष कमी व्हायचं आणि गाण्यात लक्ष केंद्रित केलं की पेटीवर विचित्र सूर निघायचे. मग ठरवलं की पेटी वादन हा सध्याचा फोकस नसल्याने गाण्याला प्राधान्य द्यायचं व पेटीवर गाणं न वाजवता आधारासाठी नुसते सूर धरायचे. असा प्रवास काही काळ चालला. पण माझ्या स्वत:च्या सीए व्यवसायामुळे पुढेपुढे अशा मैफिलींच प्रमाण फारच कमी होत गेलं. पुढे १९९९ साली नोकरिनिमित्त कुवेत मधे स्थायिक व्हायची वेळ आली. आयुष्यात प्रथमच कुटुंबापासून लांब एकटं रहायचा अनुभव घेत होतो. तेंव्हाच लक्षात आलं की संगीत हाच आपल्या एकटेपणावर रामबाण उपाय आहे. मग प्रथम भारतात आलो तेंव्हा कुवेत मधे परत आलो तो हार्मोनियम बरोबर घेऊनच. मुंबईत असताना गाणी गायचो ती प्रामुख्याने मराठीच. पण कुवेतमधे सुरुवातीच्या काळात काही मित्र झाले ते अमराठी होते, तेंव्हा आपोआपच हिंदी गाण्यांकडे वळलो. १५०-२०० जुनी हिंदी गाणी एका वहीत छान लिहून काढली आणि त्यावर बेदम रियाज केला. रोज पेटी घेऊन किमान २-३ तास तरी गायचोच. दुसरं करण्यासारखं होतं तरी काय कारण कुवेत मधे कामावरुन घरी परतलं की मुबलक वेळ हातात असतो. हे करतानाच गाताना पेटी वाजवायला ही शिकलो हळूहळू व पूर्वीप्रमाणे नुसतं सूर धरुन गायचं बंद झालं. याच सुमारास कुवेतमधे भारतीय शास्त्रीय संगीत आवडणार्‍या समविचारी माणसांशी ओळख झाली आणि त्यातून "सूर-साधना" ही स्थानिक कलाकारांची संस्था उदयास आली. या संस्थेसाठी कित्येक कार्यक्रम केले. त्यात तबला वादन, पेटीची साथ तसंच गायचीही संधी अनेकदा मिळाली आणि गाणारा माणूस हा पटकन लोकप्रिय होतो त्यामुळेच मित्रपरिवारात मोठी वाढ झाली एकदम. या अनेक कार्यक्रमात दोन कार्यक्रम आवर्जून लक्षात राहिले ते म्हणजे उस्ताद अल्लारखा खांसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय दूतावासात माझ्या आणि एका बांगला देशीय मित्राच्या तबल्याच्या जुगलबंदीचा झालेला कार्यक्रम. आणि दुसरा म्हणजे राग यमन वर मी एका तासाचा केलेला स्लाईड शो.