माझ्याविषयी (५)

कुवेतमधे १९९९ ते २००३ या काळात महाराष्ट्रीयन माणसांशी फारसा संबंध आला नाही आणि इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या अस्तित्वाची कल्पना देखील मला नव्हती. पण २००३ साली मंडळाची माहिती मिळाल्यावर लगेच त्याचा सदस्य झालो. कशी कोण जाणे पण माझ्यातल्या कलागुणांची माहिती मंडळाच्या पदाधिकार्‍यांपर्यंत पोचली आणि मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष माझ्याकडे एका कार्यक्रमाची संकल्पना घेऊन आले. कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाची अशी प्रथा आहे की दर डिसेंबर मधे जे वार्षिक स्नेहसंमेलन होतं त्यात स्थानिक कलाकारांच्या विविध गुणदर्शनाचा एक कार्यक्रम ठेवायचा. आणि २००३ साली गाण्याचा एक मोठा कार्यक्रम करावा असं अध्यक्षांच्या मनात होतं. गरज होती हा कार्यक्रम बसवू शकणार्‍या व्यक्तीची. जेंव्हा माझ्याकडे विचारणा झाली तेंव्हा मी लगोलग कबुली देऊन टाकली. कॉलेजमधील कार्यक्रम बसवण्याचा दांडगा अनुभव पाठीशी होताच. माहित नव्हती ती कुवेतमधल्या स्थानिक कलाकारांची कुवत, पण असेल त्या साधन सामुग्रीत कार्यक्रम सादर करण्याचा आत्मविश्वास मात्र होता. मग उभा झाला "प्रेम" या विषयाला वाहिलेल्या मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम. यात प्रेमाची विविध रुपं दर्शवली होती उदा. आईचं मुलावरचं प्रेम, भावा-बहिणीमधलं प्रेम, प्रियकर प्रेयसी मधलं प्रेम, माणसाचं निसर्गावरच प्रेम, प्राण्यावरचं प्रेम, देशप्रेम वगैरे वगैरे. कार्यक्रम छान आकार घेत होता. माझी भूमिका होती कार्यक्रमाची तयारी करुन घेण्याची तसंच कार्यक्रमात पेटीची साथ करण्याची. याशिवाय एकंदर २० गाण्यांपैकी ६ गाणी गायची जबाबदारीही होतीच. हा कार्यक्रम बसवतानाच असा मुद्दा निघाला की कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीने गणेश वंदनेने करावी. कार्यक्रमात भाग घेतलेल्या काही लोकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ध्वनीफिती आणूनही दिल्या माझ्याकडे आणि म्हणाले शोधा यातनं पाहिजे ती. पण माझं मन भलत्याच विचारात होतं. मी म्हटलं की काहीतरी नवीन प्रयोग करुन पहावा. स्थानिक लोकांत काही कवयित्रीही होत्या. त्यातल्याच एकीला विचारणा केली की तुम्ही गणेश स्तवन लिहू शकाल का. हे आव्हान त्यांनीही लगेच स्वीकारुन दोन दिवसात गणेश वंदना लिहून दिली. "कार्यारंभी तुजला वंदन, गणराया आम्ही करतो हो, लक्ष ज्योतींचे दीप लावूनी स्वागत तुमचे करतो हो". शब्द मलाही फार आवडले. आणि चक्क चालही बांधून टाकली मी यमन रागात. पुढच्या रिहर्सल मधे जेंव्हा ही चाल भाग घेतलेल्या कलाकारांपुढे सादर केली तेंव्हा सर्वांनीच ती उचलून धरली. ही वंदना मग मी चार लोकांकडून बसवून घेतली आणि इतर सर्वांनाच कोरस मधे गायला लावलं. प्रत्यक्ष कार्यक्रमात देखील या वंदनेची बरीच वाहवा झाली. एकंदर काय तर, कार्यक्रम उत्कृष्ट झाल्यामुळे माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं आणि स्वत:मधल्या अजून एका कलागुणाचा शोध मला स्वत:लाच लागला.