माझ्याविषयी (६)

यातूनच एक कल्पना अशी सुचली की कुवेतमधल्या काही कवयित्रींच्या रचना घेऊन त्या स्वरबध्द कराव्यात (कविता करणारा एकही पुरुष आजतागायत मला कुवेत मधे सापडलेला नाहिये हे नवलच नाही का ?). मग एकामागोमाग एक अशा ४-५ कविता स्वरबद्ध केल्या. स्वत:च्या प्रतिभेची झेप कितपत जाते हे जोखण्यासाठी पहिल्यापासून प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत बांधायचा असा निश्वय केला. आजपर्यंत जवळजवळ ६०-७० गाणी मी केली आणि हा नियम एका गाण्याचा अपवाद सोडला तर कटाक्षाने आत्तापर्यंत पाळला. याने गाणी सोपी होतात की कठीण हा मुद्दा अलाहिदा. चाली बांधायला तर सुरुवात केली पण त्या जतन कशा करायच्या ? सुरुवातीला नुसती पेटी हाताशी घेऊन त्या रचना मी संगणकावर ध्वनिमुद्रित करुन घेत असे. पण असा विचार केला की त्यात जरा म्युझिक पीसेसचा मालमसाला टाकला तर बहार येईल. मग आमच्या वाद्यवृंदात सिंथेसायझरची साथ करणार्‍या मित्राला जोडीला घेतलं. आणि त्याच्याकडून ते पीसेस बसवून मग त्यानुसार स्थानिक कलाकारांकडून गाणी बसवून घेतली. आता गाणं संपूर्ण अलंकारासह तयार तर झालं पण अडचण आली ध्वनिमुद्रणाची. कलाकार कसलेले नसल्यामुळे गाताना वाजवताना चुका व्हायच्या मग सगळं गाणं परत म्हणायचं. स्टुडियोत होणार्‍या रेकॉर्डिंग सारखी सुविधा उपलब्ध नसल्याने निर्दोष गाणं एका टेक मधे होणं अपेक्षित होतं पण ती केवळ अशक्य गोष्ट वाटू लागली. मग त्याच सिंथेसायजर वाल्या मित्राने माझी ओळ्ख करुन दिली संगणकावरच्या अशा एका प्रणालीशी की जिथे मल्टीट्रॅक ध्वनिमुद्रण शक्य होतं. एका गाण्यासाठी घरच्या संगणकावर कमाल १२८ ट्रॅक्स वेगवेगळे रेकॉर्ड करता येण्याची सोय त्यात होती. सुरुवाती सुरुवातीला या तंत्राबद्दल मला फारशी जवळीक वाटली नाही, पण नंतर मला ते हळूहळू आत्मसात करावंच लागलं आणि आजपर्यंत मी त्यात लक्षणीय प्रगतीही करु शकलोय. कित्येक जणांना आज मी माझ्या घरच्या स्टुडिओत केलेली गाणी ऎकवली तर त्यांचा विश्वास बसत नाही की हे ध्वनिमुद्रण घरी संगणकावर केलं आहे. या मल्टिट्रॅक ध्वनिमुद्रणामुळे सगळं पार्श्वसंगीत आधी रेकॉर्ड करता येऊ लागलं. म्हणजे गिटार एका ट्रॅक वर, व्हायोलिन दुसर्‍या तर सॅक्सोफोन तिसर्‍या वगैरे वगैरे. आणि सगळा ट्रॅक तयार झाला की मग गायकाने त्यावर एक एक ओळ गायली तरी चालते. जोडकाम करता येतं. येवढंच काय तर एखादा शब्द जरी चुकला तरी तेवढाच दुरुस्त करता येतो, संपूर्ण ओळ परत म्हणायची गरज नाही. (याला तांत्रिक परिभाषेत "पंचिंग" म्हणतात). आता अडचण अशी होती की माझ्याकडे सिंथेसायजर नव्हता व प्रत्येक वेळी मित्रावर अवलंबून रहायचं म्हणजे मला स्वत:च्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मी चक्क स्वत:चा सिंथेसायजर विकत घेऊन त्यावर काम केलं. घरच्या संगणकातही चांगल्या प्रतीचं ध्वनिमुद्रण करता येण्यासाठी आवश्यक ते फेरबदल केले. पुढे तर अतिशय प्रगत असा सिंथेसायजर घेतला व आता तर संगणकाचाही वापर न करता संपूर्ण गाणं मी सिंथेसायझरवर तयार करायला लागलो आहे. हे सर्व शक्य होतं ते कोणतंही तंत्रज्ञान अवगत करण्याची भीती अजिबात नसल्याने.