माझ्याविषयी (७)
Submitted by विवेक on Tue, 02/03/2009 - 22:39
आता संपूर्ण गाणं तयार करता व ध्वनिमुद्रित करता पण येऊ लागलं पण अडचण अशी की माझा पिंड भारतीय संगीताचा व सिंथेसायझरवर उपलब्ध असलेली वाद्यं बरीचशी पाश्वात्य. आणि कुवेतमधे भारतीय वाद्य वाजवणारे कलाकार आणायचे कुठून. या अडचणीवर पण मात झालीच शेवटी. स्वित्झर्लंड मधे एक "स्वरसिस्टिम्स" नावाची कंपनी आहे त्यांनी "स्वरशाला" नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे ज्यात तबला, ढोलक, पखवाज, बासरी, झांज, डफ अशा विविध भारतीय तसंच काही पाश्वात्य वाद्यांची आद्याक्षरं उपल्ब्ध करुन दिली की ज्याचा वापर करुन तुम्ही स्वत:चं संगीत निर्माण करु शकता. या कंपनीने नामवंत कलाकार बोलवून त्यांच्याकडून त्या वाद्यांचे एक एक बोल वाजवून ते ध्वनिमुद्रित करुन संगीतकारांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे झालं असं की मी या विविध वाद्यांचा वापर माझ्या रचनांमधे करु शकलो. त्यामुळे माझा एक प्रकारचा "वन मॅन बँड"च तयार झाला. ज्यात संगीताची सगळी डिपार्टमेंटस मी एकटा सांभाळू शके. उदा. गाणं निवडणं, त्याला अनुरुप चाल बांधणं, सुरवातीचं व दोन अंतर्यांमधलं म्युझिक तयार करणं, ते वाजवण आणि ध्वनिमुद्रित करणं, ट्रॅक तयार झाल्यावर ते गाणं स्वत: गाणं, नंतर आवाजाला रिव्हर्ब, एको, कोरस असे वेगवेगळे इफेक्टस देणं, आणि अगदी शेवटी ट्रॅक्सचं मिक्सिंग करुन त्याचं एका परिपूर्ण गाण्यात रुपांतर. या स्वरसिस्टीम्स कंपनीला त्यांची प्रणाली वापरुन केलेली माझी दोन गाणी पाठवली असता त्यांनी त्या रचनांना त्यांच्या संकेतस्थळावर स्थान दिलं. आजही ही ती तुम्हाला www.swarsystems.com या संकेतस्थळावर swarcafe या विभागात ऎकता येतील. अशा तर्हेने केलेली काही गाणी कुवेतमधल्या मित्रांना दाखवली तेंव्हा त्यांनी फार कौतुक केलं आणि तुम्ही कमर्शियल अल्बम का काढत नाही असा किडा माझ्या डोक्यात सोडून दिला. माझ्या सवयीप्रमाणे सुरुवातीला हे "झेपलेस" प्रकरण आहे आणि आपल्याला जमणार नाही असाच नजरिया होता एकंदर, पण नंतर आत्मविश्वास थोडा बळावला. चांगलं काव्य हाती मिळायला लागलं. पूर्वी कवितांच्या वाटेला न जाणार्या मला आता कविता समजायला लागल्या होत्या. मीटरही कळायला लागलं होतं, अर्थात ताल पक्का असल्याने हे काव्यातलं मीटर प्रकरण काही नवं वाटलं नाही. अशीच कधीतरी "मायबोली" या मराठीतल्या जुन्या आणि अग्रगण्य संकेतस्थळाची ओळख झाली आणि त्यातल्या काव्यविभागात मी मनसोक्त विहार करु लागलो, अर्थात वाचनमात्र भूमिकेत. तेंव्हा लक्षात आलं की कित्येक नवोदित कवी फार ताकदीचं लिहितात. अल्बमचं हळूहळू डोक्यात घोळत होतंच. पण या नवोदित कवींची भरारी पाहून विचार पक्का केला की आपल्या अल्बममधे प्रथितयश कवींबरोबरच या नवोदितांनादेखील स्थान मिळालंच पाहिजे. आणि ते मी करुनही दाखवलं, ९ पैकी ५ गाणी नवोदितांची घेऊन. हे सर्व नवोदित म्हणजे मायबोलीवर परिचय झालेले.
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 397 reads