माझ्याविषयी (८)
Submitted by विवेक on Wed, 02/04/2009 - 02:20
२००४ या बहराच्या काळात बरीच गाणी केली आणि २००५ मधे अल्बम करायचा विचार नक्की झाला. संगीतकार म्हणून माझा हा पहिलाच प्रयत्न त्यामुळे संगीत जगतात मला कोणी नावाने ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे पहिलाच प्रयत्न असला तरी खर्चात कुठेही कसूर करायची नाही आणि आघाडीचे कलाकार घेऊन अल्बम काढायचा असाच निश्वय केला. मी कुवेतमधे आणि अल्बमचं काम होणार सगळं मुंबईत, मग याची सर्व पूर्वतयारी करायची कशी इथे बसून. मग असं ठरलं की माझी बायको वैशाली हिने मुंबईत जायचं आणि सगळी पूर्वतयारी करायची, आणि सगळी फिल्डिंग लागल्यावर मग मी एक महिन्याची सुटी घेऊन मुंबईला जाऊन सर्व पार पाडायचं. सर्वात प्रथम लागणारी गोष्ट म्हणजे ऍरेंजर शोधणं, कारण या ऍरेंजरचं काम असतं मधलं सगळं म्युझिक तयार करणं, त्याचं नोटेशन बनवणं, वाजवणारे कलाकार शोधायचे, त्यांच्याकडून ते वाजवून घ्यायचं वगैरे वगैरे. या साठी श्रीधर फडके यांचं मार्गदर्शन लाभलं व त्यांच्यासाठी काम करणारे अरविंद हसबनीस यांचं नाव त्यांनी ऍरेंजर म्हणून सुचवलं. माझ्या गाण्यांच्या बाबतीत एक गोष्ट अशी होती की संपूर्ण गाणी (म्युझिक पीसेस सकट) तयार होती. त्यामुळे ऍरेंजरचं काम जरा सोपं होतं. जिथे बदल आवश्यक होते तिथेच त्याने बदल करायचे होते. सुदैवाने मी केलेले बरेचसे पीसेस हसबनीसांनी स्वीकारले आणि त्यामुळे कामाला वेग आला. माझ्या गाण्यांच्या पायलट सीडीज वैशालीने हसबनीसांपर्यंत पोचवल्या. आणि त्यातली ८ गाणी आम्ही एकमेकांशी चर्चा करुन ठरवली. आधी जरी ८ गाणीच ठरवली होती तरी ऍरेंजरच्या आग्रहाखातर सुरेश भटांची एक गझल नववं गाणं म्हणून टाकायचं ठरलं. या गाण्याच्या ऍरेंजमेंटचं काम हसबनीसांनी संपूर्णपणे नव्याने केलं आणि त्यांचं काम मलाही प्रचंड आवडलं.आघाडीचे गायक घ्यायचे हे ठरलंच होतं. त्याप्रमाणे माझ्या मनात पद्मजा फेणाणी व सुरेश वाडकराचं नाव होतं. ओळ्खी काढून या दोन्ही कलाकारांपर्यंत वैशाली पोचली व त्यांची संमती मिळवून तारखा नक्की केल्या. पद्मजाताईंनीच ध्वनिमुद्रणासाठी या क्षेत्रातले एक तज्ञ अविनाश ओकांच्या स्टुडियोचं नावं सुचवलं. तोही निश्वित केला. हे सगळं ठरल्यावरच मी रजा टाकून मुंबईला गेलो. सर्वप्रथम ऍरेंजर बरोबर बसून ध्वनिमुद्रणाची प्राथमिक तयारी केली. हे सर्व चालू असतानाच व्हीनस या नावाजलेल्या वितरकांकडे गाण्यांचे पायलटस घेऊन गेलो. कंपनीच्या व्यवस्थापकांनी पायलटस ऎकून वितरणाची जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे एक मोठी बाजी मारल्यामुळे हुरुप आणखीनच वाढला. सर्व तयारी झाल्यानंतर स्टुडिओ मधे ध्वनिमुद्रण केलं. ही संपूर्ण प्रक्रिया (जरी मी ती लहान प्रमाणार घरच्या संगणकावर करत असलो तरी) एक प्रचंड आनंददायी अनुभव होता. आणि आपल्या गाण्याचं सोनं होतंय हे पहाताना काय मजा येत होती सांगू. पण ध्वनिमुद्रणाचा तो आठ दिवसांचा काळ म्हणजे प्रचंड कामाचा ताणही होता. पण सांगितिक बाजू मी व इतर व्यवस्थापनाची जबाबदारी वैशालीने समर्थपणे हाताळली. अल्बम तयार झाल्यावर त्याच्या सीडी कव्हरच्याही कामात आम्हालाच लक्ष घालावं लागलं. टेलिव्हिजन च्या चॅनेल्स साठी जाहिरात करण्याची जबाबदारी पण व्हीनस ने आमच्यावरच ढकलली होती. तोही एक अनुभव त्यानिमित्ताने आला.
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 223 reads