माझ्याविषयी (अंतिम भाग)
आता आला उदघाटनाचा सोहळा. सर्वप्रथम नाव डोळ्यासमोर आलं ते श्रीनिवास खळेसाहेबांचं. अल्बम घेऊन त्यांच्याकडे गेलो. प्रकृती बरी नसतानाही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला आणि त्यातली ५ गाणी संपूर्णपणे लक्ष देऊन ऎकली (त्यापेक्षा अधिक त्रास त्यांना देणं मलाही उचित वाटलं नाही). गाणी ऎकून त्यांनी पाठीवर कौतुकाचा हात ठेवला आणि "बाजारात खपेल असं संगीत निर्माण करायच्या मागे न लागता स्वत:ला आवडेल अशाच संगीताची निर्मिती करत रहा" असा मोलाचा सल्ला दिला. एकप्रकारे ते माझ्या विचारसरणीवर केलेलं शिक्कामोर्तबच होतं. उदघाटन सोहळ्याला यायचं त्यांनी कबूल केलं. खळेसाहेबांच्या बरोबर दुसरे पाहुणे म्हणून मराठी संगीतात मोलाची कामगिरी बजावणारे कविवर्य शांताराम नांदगावकर यांना विचारणा केली. त्यांचीही प्रकृती बरी नसताना त्यांनी "येईन पण भाषण करणार नाही" या बोलीबर होकार दिला. मात्र उदघाटन सोहळ्याच्या दिवशीच खळेसाहेबांकडून निरोप मिळाला की त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याने ते उदघाटनाला येऊ शकणार नाहीत त्यामुळे बराच विरस झाला. उदघाटनाला शांताराम नांदगावकरांबरोबरच पद्मजा फेणाणी, माझे तबल्यातले गुरु पं. मुळगांवकर, माझा पत्रकार मित्र निखिल वागळे, कवी सदानंद डबीर हे मंचावर उपस्थित होते. सोहळा व्यवस्थित पार पडला. दूरदर्शनवरच्या निवेदिका वासंती वर्तक यांनी निवेदनाची जबाबदारी स्वीकारली होती. व्हीनस ने अल्बम संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला. ज्यांनी हा अल्बम ऎकला त्यांनी तोंडभरुन कौतुक केलं. त्यामुळे ठरवलं की हा प्रवास असाच जारी ठेवायचा. पुढच्या वर्षात लगेच दुसरा अल्बम प्रकाशित करायचा मानस काही पूर्ण होऊ शकला नाही कारण २००५ व २००६ साली कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात सचिव व अध्यक्षपदाची जबाबदारी अंगावर पडल्याने संगीत निर्मितीमधे एक प्रकारचा अडथळा निर्माण झाला. पण २००७ साली मंडळाचा कार्यभार दुसर्यांवर सोपवून परत संगीत निर्मिती कडे वळलो. "प्रणयगंध" या माझ्या दुसर्या अल्बमचं ध्वनिमुद्रण डिसेंबर २००८ मधे पूर्ण करुन मे,२००९ मधे तो प्रकाशित देखील झाला. त्याची छायाचित्रं आणि चित्रफिती आपल्या सर्वांसाठी याच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
असा हा माझा आजवरचा संगीत प्रवास :-)
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 433 reads
मा, काजरेकरजी...सप्रेम