स्पर्श चांदण्याचे - माझा पहिला अल्बम
या विभागात सर्व संगीतप्रेमींचं स्वागत
तुमच्या श्रवणासाठी माझा २००५ साली प्रकाशित झालेला "स्पर्श चांदण्याचे" हा मराठी प्रेमगीतांचा अल्बम सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. या संगीतसंचाची पूर्ण निर्मिती ही माझी स्वत:ची असून सर्व महाराष्ट्रात हा संच रसिकांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था "व्हीनस रेकॉर्डस" या नामांकित कंपनीने स्वीकारली होती.
या संचात गझलसम्राट सुरेश भट, कविवर्य वसंत बापट, ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर या नामवंतांच्या रचना आहेत, त्याचप्रमाणे प्रसन्न शेंबेकर, जयश्री अंबासकर आणि तुषार जोशी यांसारख्या नवोदित कवी / कवयित्रीच्या रचनांचा पण समावेश आहे.
माझ्या या पहिल्यावहिल्या प्रकल्पाला सुरेश वाडकर व पद्मश्री पद्मजा फेणाणी - जोगळेकर या मराठीतल्या दोन अग्रगण्य कलाकारांचा आवाज मिळाला हे मी माझं भाग्य समजतो.
आजच्या सिंथेटिक युगात आपल्या अभिजात वाद्यांचा सुरेलपणाची कुठेतरी कोंडी होतेय याची जाणीव मला पूर्णपणे आहे. त्यामुळे अट्टाहासाने या संगीत संचासाठी मी सतार, सरोद, बांसरी, क्लॅरिओनेट, सॅक्सोफोन, व्हायोलिन, व्हायब्राफोन, गिटार, तबला, ढोलक या वाद्यांचा सढळ हस्ते वापर केला आहे आणि सिंथेटिक आवाज अगदी आवश्यक तिथेच परिणाम साधण्यासाठी वापरले आहेत. या गाण्यांचा आस्वाद घेताना ही बाब ठळकपणे आपल्या लक्षात येईलच.
२००३ ते २००५ या काळात केलेल्या माझ्या अनेक संगीतरचनांपैकी माझ्या आवडीच्या ९ निवडक रचना या संचात अंतर्भूत केल्या आहेत. जुन्या मराठी गाण्यांची खासियत म्हणजे बहुतांश गाण्यांची प्रत्येक अंतर्याची चाल निराळी असायची. माझी ही गाणी ऎकताना सुध्दा आपल्याला हाच सुखद अनुभव येईल. आशा आहे की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडेल. ही ९ गाणी आपण डाऊनलोड करुन घेऊ शकता. आपले अभिप्राय इथे नोंदवलेत तर मला आनंद होईल. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इथे भेट द्या
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 2738 reads