माझ्याविषयी (१)

माझा जन्म मुंबईचाच. १९५९ सालचा. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे घरात माणसं भरपूर पण प्रत्येकाला संगीताची आवड. घरातला प्रत्येक पुरुष माणूस जुजबी दोन-तीन वाद्ये वाजवू शकत असे. शास्त्रीय संगीत तर घरात सदैव कानावर पडत असे. घरात लहानपणापासूनच वेगवेगळी वाद्यं सतत आजूबाजूला पहाण्याची सवय. पेटी, तबला, सतार, दिलरुबा, व्हायोलिन, मेंडोलिन अशी अनेक वाद्यं आमच्या घरी माझ्या लहानपणापासून पहात आलो आहे. माझे वडील सदाशिव काजरेकर हे फरुखाबाद घराण्याचे खलिफा उस्ताद अमीर हुसेन खांसाहेबांचे गंडाबंध शागीर्द होते. तसे घरातल्या माणसांपैकी पद्धतशीर काहीतरी शिकलेले म्हणजे माझे वडीलच, बाकी सर्वजण अंगातल्या उपजत गुणांमुळेच वाद्यांशी सलगी ठेवून होते. वडिलांचा नियमित रियाज कानावर पडायचा, त्यामुळे साहजिकच माझा ओढा तबल्याकडे असावा. मग मी वयाच्या ८-९ वर्षापासून वडिलांकडे तबल्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. आणि ७-८ वर्ष त्यांच्याकडेच शिकलो. दहावी पास झाल्यानंतर वडिलांनी मला त्यांच्याच एका गुरुबंधूंकडे (पं. अरविंद मुळगांवकरांकडे) शिकायला पाठवलं. तबला क्षेत्रात आज पं. मुळगांवकर हे एक आदर्श शिक्षक म्हणून समजले जातात आणि कित्येक मान्यवर अजूनही त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. पं. मुळगावकरांकडे तबला शिकत असतानाच बारावी पास झाल्यावर मी सी. ए. चं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सीए करताना ३ वर्षाची उमेदवारी करावी लागते आणि त्यानिमित्त मला सतत बाहेरगावी जावं लागायचं. या कारणाने तबल्याचं शिक्षण जे खुंटलं ते आजतागायत. पण त्याकाळी तालाचा जो पक्का पाया तयार झाला त्याचा आज मला खूपच उपयोग होतो आहे. तबला शिक्षण चालू असतानाच मधेच मला घरातलं मेंडोलिन हातात घ्यावंसं वाटलं. आणि वडिलांनी त्याचेही थोडेफार धडे दिले. वडिलांची शिकवण्याची पद्धत अनोखी होती. ते तोंडाने कोणतंतरी गाणं किंवा शास्त्रीय संगीतातली चीज म्हणायचे आणि मी ते नीट ऎकून ते स्वर मेंडोलिनमधून काढायचो. याच सुमारास त्यांनी मला नोटेशन देखील शिकवलं. म्हणजे ते तोंडाने "निसारेध निसारेग मपरेसा" अशा पद्धतीने स्वरलिपीत गायचे आणि स्वर कोमल का शुद्ध हे ऎकून मी ठरवायचो व तसं वाजवायचो. या स्वरलिपीचाही फायदा आज मला खूप होतोय. रात्री जेवताना तर मुंबई ब केंद्रावरचा १०.३० वाजताचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऎकणे हा तर लहानपणीचा कित्येक वर्षांचा नित्यनेम असे. आणि हे ऎकताना वडिलांचा कोडी घालण्याचा प्रकार कायम चालू असे. कोडं म्हणजे राग कोणता, ताल कोणता हे ओळखणं. सरावाने मी वडिलांच्या परिक्षेत १००% उत्तीर्ण होऊ लागलो. बरोबरीने विविध भारतीवरचा सकाळचा साडेसातचा संगीत सरिता कार्यक्रमही मी नित्यनेमाने ऎकू लागलो. या कार्यक्रमात एखादा राग घेऊन त्यातली शास्त्रीय बंदिश व त्या रागावर आधारलेलं हिंदी चित्रपटातलं एखादं गीत ऎकवलं जायचं. या कार्यक्रमाचाही रागदारीबद्दल माहिती पक्की होण्यासाठी खूपच फायदा झाला. शास्त्रीय संगीत येवढं ऎकलं तरुण वयात की कान पक्का तयार झाला. अनेक गायकांच्या मैफिली प्रत्यक्ष (अगदी स्टेजला हात लागेल इतक्या जवळ बसून) ऎकल्या. मुंबईहून खास पुण्याला जाऊन सवाई गंधर्व संगीत महोत्सवालाही कित्येकदा हजेरी लावून कान तृप्त करून घेतले. मुंबईत होणारी संमेलनेही चुकवली नाहीत.