बालगंधर्व : मे, १९७७ मधील मिरज येथील भाषण

मित्रहो,

भाषणाच्या सुरुवातीला मी (इतका निर्ढावलेला माणूस असूनही) इतका कधी घाबरुन गेलो नव्हतो. घाबरुन अशासाठी की माझ्याकडे बोलायला मुद्दे नाहीत म्हणून नाही, परंतु इतके आहेत की मला काय करावं ते कळेनासं झालंय. बालगंधर्वांच्या गाण्याबद्दल, त्यांच्या अभिनयाबद्दल इतकं बोलण्यासारखं आहे की काय बोलावं अशी अवस्था झाली आहे. उद्या जर आपल्याला सांगितलं की चांदणं या विषयावर बोला, तर काय बोलणार ? आपल्याला बोलता येत नाही हे कळणारा मनुष्यच फक्त बोलू शकेल. त्यामुळे "बालगंधर्व" या विषयावर मी काय बोलावं हेच कळत नाहिये.

एक साधी गोष्ट पहा. आज या १९८८ साली मे महिन्यामधे, या अशा वातावरणामधे, बालगंधर्वांच्या प्रेमाने इतकी माणसं एकत्र येतात हाच मी एक अभूतपूर्व चमत्कार समजतो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा घट्ट आहे, चांगला आहे, ताठ आहे असं दाखवणार्‍या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यात बालगंधर्वांवरचं प्रेम हा एक महत्वाचा कणा आहे असं मी समजतो. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राने तीन व्यक्तींवर जिवापाड प्रेम केलेलं आहे. ही महाराष्ट्राची सांस्कृतिक दैवतं आहेत असं म्हटलं तरी चालेल. पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि तिसरे बालगंधर्व. ही तीन निरनिराळ्या क्षेत्रातली माणसं आहेत. अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळू शकते, परंतु विभूतीमत्व मिळणं हे फार कठीण आहे. व्यक्तिमत्व मिळू शकतं पण विभूतीमत्व मिळत नाही.आणि ते का मिळतं ते कधी कळत नाही. आमच्या समीक्षकांना तर कळणंच शक्य नाही, म्हणून ते समीक्षक झाले. कारण असे काही चमत्कार असतात की ज्याचं शवविच्छेदन करताच येत नाही. त्या गोष्टींचं शवच होत नाही - ती जिवंतच असते. त्याच्यावरती चर्चा संभवत नाही. त्याच्यावर एकच गोष्ट संभवते ती म्हणजे त्याची आठवण काढणं. आणि संजयाने म्हटल्याप्रमाणे "हृष्यामि च पुन: पुन:" असं म्हणणं. श्रीकृष्णाचे ते स्वरुप आठवल्यानंतर श्रीकृष्ण म्हणाला "हृष्यामि च पुन: पुन:", त्याचप्रमाणे बालगंधर्वाचं स्वरुप आठवावं, त्यांचं कर्तृत्व आठवावं आणि एकमेकांमधे आपण आनंदित झालो आहोत या भावनेने जगावं यापलिकडे या इथे दुसरी कुठलीही देवाण घेवाण नाही.

त्यांच्याविषयी अधिकारवाणीने बोलावं, त्यांच्या अभिनयाची जातकुळी काय होती - गायनाची परंपरा काय होती, येवढा मला अधिकार नाही. आणि तो अधिकार मला नाहिये हे मला माहित आहे ही त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट सांगतो की हा अधिकार मिळवण्याची शक्यता आहे. ती अशी की बालगंधर्व ज्या रीतीने या कलेकडे गेले त्या रीतीने जर आपण या कलेचा प्रवास केला तर आपल्याला हा अधिकार मिळवता येईल. तो भक्तिमार्ग आहे. बालगंधर्व हे भक्तीमार्गी कलावंत होते. कल्पना करा की "एकच प्याला" नाटक आहे आणि त्यातली सिंधूची भूमिका करायची आहे, तर त्यांनी त्याच्यावरती चर्चा वगैरे केली नाही. किंबहुना माझ्या डोळ्यापुढे "एकच प्याला" मधली सिंधूची भूमिका कशी करावी अशा विचारात पडलेले बालगंधर्व दिसतच नाहीत. ती भूमिका त्यांनी वाचली, ऐकली आणि ते सिंधू होतच गेले. पण ही तन्मयता अशी होती की त्या तन्मयतेमधे त्यांनी स्वत:ला वाहू दिले नाही. ते नुसते प्रतिभावंत नव्हते तर उत्तम प्रज्ञावंत होते आणि परिष्करणाची तर त्यांना अत्यंत आवश्यकता वाटत होती. ह्या सगळ्या साच्यातून त्यांची भक्ती ही आंधळी भक्ती झालेली नव्हती तर ती डोळसपणाने केलेली भक्ती होती. आणि याचं उत्तम उदाहरण त्यांनी जे संवाद म्हटले, गाणी म्हटली त्याच्यामधे आपल्याला दिसून येतं.

बालगंधर्वांच्या गायकीबद्दल बोलायचं म्हणजे भारतीय संगीताच्याच गायकीबद्दल बोलायला पाहिजे असं माझं मत आहे. बालगंधर्वांची गायकी म्हणजे ते नाटकात गायले म्हणून नाटकातली गायकी असं म्हणणं चुकीचं आहे. बालगंधर्वांचा यमन आणि भास्करबुवांचा यमन याची जातकुळी निराळी नव्हती, फक्त कारण निराळं होतं. त्या यमनातलं काय घ्यावं, काय घेऊ नये हे कळणं हे चांगली दृष्टी, चांगली नजर, चांगली बुध्दी असणार्‍या माणसालाच शक्य आहे. अर्थात देणगी जर म्हणाल तर त्यांना आणखी एक देणं लाभलं होतं यात काही शंकाच नाही. ते म्हणजे त्यांचा जो स्वर होता तो "जन्मजात भिजलेला" स्वर होता. त्यांनी "नाथ हा माझा" म्हटलं की प्रत्येक माणसाला असं वाटायचं की हा जो कोण हिचा नाथ असेल त्याचा हेवा करावा असला हा नाथ आहे. ज्या वेळेला ते "नाथ हा माझा" म्हणत असत ती त्यांची म्हणून एक गायकी होती. ती गायकी त्या भूमिकेला अधिक ओलावा आणून देत होती. कारण तुम्ही त्यांच्या सगळ्या भूमिका बघा. त्याच्यातलं प्रेम जे आहे ते प्रेमसुध्दा "सुखविलासी सोडी न विनया" अशा संस्कृतीत वाढलेल्या बाईचं प्रेम आहे. त्यामुळे बालगंधर्वांच्यावर लोक "उल्लू" झाले नाहीत तर बालगंधर्वांवर लोकांची भक्ती जडली. चित्रपटातल्या नटनट्यांची जी लोकप्रियता असते त्याबद्दल आम्ही काय बोलावं ? परंतु त्याच्यामधे "काय मी उल्लू झालो" असं असतं. बालगंधर्वांच्या बाबतीमधे तसं झालं नाही. कारण त्यांनी जे दर्शन घडवलं ते स्त्रीत्वातलं जे काही पवित्र, सुंदर, सात्विक होतं त्याचं दर्शन असे.

त्यांच्या प्रत्येक वेळच्या अभिनयाचा क्षण मला आठवतो. माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून बालगंधर्वांच्या संस्कारात वाढलेला मी मुलगा आहे. (म्हणजे मुलगा होतो -आता मुलगा नाहिये ). पण बालगंधर्व म्हटलं की मला मुलगेपणच आठवतं. मला आठवतंय की वयाच्या सातव्या वर्षी मी पेटीचा सोलो कार्यक्रम केला. बाल-कलावंत असल्यामुळे माझं पुढे जे काही "वांगं" व्हायचं होतं ते झालं. पण बालगंधर्वांना "सत्य वदे वचनाला" ऐकवलेला मी बहाद्दर आहे. मला सातवं वर्ष असल्याने "पोर आहे, जाऊ दे, बिचारा" म्हणून बालगंधर्वांनी मला क्षमा केलेली असणार. परंतु त्यांच्या आयुष्यात त्यांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या त्यातली तीही एक यातना त्यांना आयुष्यभर लक्षात राहिली असेल. त्यांच्या पुढे मी दाबून "सत्य वदे वचनाला" वाजवलं आणि मी आपल्याला आश्चर्य सांगतो - असे खुर्चीवर बसले होते ते उठून माझ्यासमोर मांडी घालून बसले. मी जसं ह्या मुलीचं गाणं ऐकायला समोर बसलो होतो -ती त्यांची नक्कल म्हणून नाही - तर मला मनापासून वाटलं म्हणून बसलो - त्यावरुन मला आठवण झाली. बालगंधर्व असे समोर बसले होते आणि आणि अतिशय सुंदर रीतीने ऐकत होते. दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर मला त्याचं बक्षिस मिळालं. माझे एक गणिताचे मास्तर होते. त्या विषयाचं आणि आमचं प्रेम काही विचारु नका. ज्या कुठल्या ब्रह्मदेवाने हा विषय निर्माण केला असेल त्याची चारी तोंडं उडवली पाहिजेत असं माझं मत आहे. आम्हाला छळायला तो विषय होता. गणित हा विषय आला की त्यात अगणित संकटं ठरलेली. तर त्या माझ्या गणिताच्या मास्तरांनी मी बालगंधर्वांसमोर पेटी वाजवताना पाहिलं. दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यानंतर माझे गणिताचे मास्तर म्हणाले "पुरुषोत्तम, काल बालगंधर्वांना मान डोलवायला लावलीस ना ? आता गणिताचा पेपर कोरा दे - तुझे ३५ मार्क ठरलेले आहेत". असे उदात्त मनाचे शिक्षक सुध्दा होते एके काळी.

तात्पर्य काय की लहानपणापासून बालगंधर्वांचं गाणं ऐकलेलं होतं, त्याच्या नादामधे आम्ही होतो. त्यामुळे बालगंधर्वांचं नाटक हे आमच्या घरातला देवीचा एखादा कुळाचार पाळावा तसंच होतं. तसं आमचं कुटुंब श्रीमंत नव्हतं. आम्ही पिटाचेच अधिकारी होतो. नऊ आण्यातच आम्ही बसत होतो. पण बालगंधर्व मुंबईला आले की न चुकता त्यांचं नाटक मुलांना दाखवलंच पाहिजे, हा सांस्कृतिक संस्कार त्यांच्यावर झालाच पाहिजे याची जिद्द, आवड, ओढ असलेले आई-बाप मला लाभले होते हे मी माझं सगळ्यात मोठं भाग्य समजतो. त्यांच्यामुळे मला बालगंधर्व लाभले. माझ्या वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी मी "एकच प्याला" हे नाटक रॉयल ऑपेरा हाऊस मधे पाहिलं होतं. माझ्या डोळ्यासमोर आता तो प्रसंग येतो आहे. काय सांगू तुम्हाला ? इथे आल्यानंतर त्या गालिच्यावर चढताना एकदम आपण काहीतरी अपमान करतो आहोत असं वाटलं. पायसुध्दा लागता कामा नयेत असा तो गालिचा आहे, ज्याला बालगंधर्वांचे पाय लागलेले आहेत. खरं सांगायचं तर मला हातांनी असं उलटं चालता आलं असतं तर तसा गेलो असतो, पण हार घालायची पंचाईत झाली असती. अशा वातावरणात बालगंधर्वांच्या नाटकाला जे लोक यायचे, काय सांगू तुम्हाला, घरातलं लग्नकार्य अशा रीतीने लोक यायचे. ह्याचं कारण आहे. बालगंधर्वांचं नाटक पहाणं म्हणजे धार्मिक संस्कारांसारखा लोकांना संस्कार वाटायचा. तुम्हाला सांगतो, काय उत्सव असायचा. असा उत्सव मी पुन्हा पाहिलेला नाही. नाटकांच्या लोकप्रियता पाहिल्या. माझीही काही नाटकं लोकप्रिय झाली (चुकून). परंतु लोकांचा अशा प्रकारचा उत्साह की एखाद्या सांस्कृतिक कार्याला, लग्नामुंजीला जावं तसे कपडे घालून - म्हणजे त्या सुभद्रा रुक्मिणीपेक्षा बघायला आलेली बाईच जास्त नटलेली असायची - अशा तर्‍हेने नटलेली मंडळी असायची. याचं कारण होतं की हे जे काही नाटकाला जाणं आहे हे नुसतं नाटकाला जाणं नाहिये तर एक उत्तम मोठा सांस्कृतिक अनुभव घेणं आहे अशा प्रकारच्या वृत्तीने लोक जात असत. अशा प्रकारच्या वृत्तीने जाणार्‍या लोकांना पुरेपूर माप बालगंधर्व पदरात घालत असत.

त्याच "एकच प्याला" ची मला आठवण आहे. मला अजून काल पाहिल्यासारखं ते नाटक डोळ्यासमोर दिसतं. "लागे हुरहुर हृदयी" सुरु झालं की नाटकावर एक प्रकारची काळ्या ढगांची छाया जमल्यासारखी वाटायची. माझ्या लहान मनाला वाटलेली ही भावना मी आपल्याला सांगतो आहे. त्यानंतर "एकच प्याला" अनेक वेळा पाहिलं. दर वेळेला ते गाणं सुरु होण्यापूर्वी असंच वाटायचं. पण खरं म्हटलं तर माझी ही सांस्कृतिक पूजा नाटक सुरु होण्याच्या आधी एक तासापासून सुरु व्हायची. म्हणजे तिरखवाँ खाँसाहेब आणि कादरबक्ष हे आपापली हत्यारं ज्यावेळेला जुळवत असत त्याक्षणापासून माझी सांस्कृतिक पूजा सुरु व्हायची. मी तुम्हाला खरं सांगतो - तुमच्यापैकी ज्या कुणाला गाणं ऐकायचं असेल त्यांनी आयत्या वेळेला गाणं ऐकायला जाऊ नये, तंबोरे जुळत असताना जावं. म्हणजे तो तंबोरा जसा जसा सुरात येतो ना , तसं तसं आपलं मन त्या सुरांमधे येत असतं. मग रिक्षावाल्याने काय भांडण केलं ते आपण सगळं विसरुन जात असतो. (हजर रिक्षावाल्यांनी मला क्षमा करावी). आपण त्या स्वरांमधे तन्मय होतो. तर त्या नाटकामधे त्या सारंगीचा मस्त स्वर लागला आणि त्या लागलेल्या स्वरामधे तिरखवाँ साहेबांची "ठाण्ण" अशी कडाडून थाप गेली की त्या थिएटरचं छप्पर उडून जात होतं. ते कदाचित आज गणपतराव सुध्दा आपल्याला सांगतील. अशी थाप (राजकारणी लोकांकडून ऐकली आहे ते सोडून द्या) दुसर्‍या कोणाकडून कधीही ऐकलेली नाही. सगळं थिएटर उडायचं हो ! काय ती थाप ! आणि त्यानंतर त्या मखमली पडद्यावर फूटलाईटस झेपावायचे. मखमली पडद्यावर फूटलाईट्स पडले तो क्षण आणि "प्रभू पदास नमित दास" ह्या नांदीचा क्षण - मी खरोखर सांगतो - ज्या वेळेला आपण केवळ जिवंत आहोत अशा प्रकारचा आनंद वाटतो ना - अशा प्रकारचे हे क्षण आहेत. हा क्षण पहायला आपण जिवंत आहोत, हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत - बाकी काही नाही. असे असंख्य क्षण ज्या माणसाने दिले त्या माणसाचं नाव "नारायणराव बालगंधर्व". त्यांनी आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक क्षणाचं सोनं करुन आपल्याला दिलं.

गोविंदराव टेंबे एकदा म्हणाले होते, आणि मास्तर कृष्णरावही म्हणाले होते की "आम्ही नारायणरावांना चाली करुन देतो. पण त्यांच्या गळ्यात ती चाल इतकी सुंदर व्हायला लागते की ती आम्हीच केली आहे की काय अशी शंका आम्हाला यावी". त्या चालीत बालगंधर्व एखादा बारीकसा कण लावायचे आणि बालगंधर्वांच्या गाण्यातला तो कण म्हणजे मणाइतक्या किंमतीचा मोठा असतो. बारीकसा स्वर असतो, जरासा लागलेला असतो. तुम्ही कधी "पुष्प पराग सुगंधित" ची रेकॉर्ड ऐकली तर कळेल. सूक्ष्म रीतीने ऐकलं तर त्याच्यामध्ये शुध्द मध्यम बारीकसा लागलेला आहे. म्हणून बालगंधर्वांची गाणी जी नवीन मंडळी गाऊ इच्छितात त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही बालगंधर्वांची गाणी नुसती ऐकू नका, त्यातला क्षण न क्षण पहा. तो इतका महत्वाचा आहे. आता बघा, वर चीज दिलेली असते "पीहरवा के हारी नेक नजर पर". ही चीज सगळ्यांना माहिती आहे. पण "टकमक पाही सूर्य रजनीमुख" मधे नारायणरावांनी अशी गंमत केली आहे की ते टकमक पहाणं सुंदर झालं, ते टकमक बघत रहावं अशा रीतीचं झालं. एक लहानशी करामत त्याच्यामधे केली आहे. आणि तुम्हाला सांगतो, नारायणरावांनी गाताना जरुर नसलेलं असं काही केलं नाही. असं वाटतं की ही तान इथेच पाहिजे होती. मोठ्या कलेचं हेच लक्षण आहे की त्यात कुणाला ऑल्टर्नेटिव्ह सुचत नाही. ह्याच्या ऐवजी ते चाललं असतं असं तुम्हाला काही सुचलं की ती कला काहीतरी खालच्या दर्जाची आहे असं समजावं. ताजमहालमधे जराशी अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणता येत. नारायणरावांच्या गायकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की हे सगळं करताना आपण काहीतरी करुन दाखवतोय हे कोणालाही कळायचं नाही. हे होतंय, हे घडतंय असंच वाटायचं. आणि त्यामुळे लोकांना वाटायचं की हे जन्मजात आहे. नटाचं मुख्य काम हे की "हा राजा आहे" असा भास त्याने तुमच्यापुढे निर्माण करायचा असतो. दर वेळेला प्रेक्षकाला जे वाटत असतं की बालगंधर्व तद्‍रुप झालेले आहेत. त्या भूमिकेमधे ही तद्‍रुपता ही त्या नटाने आपल्या कलेने मिळवलेली, दाखवलेली तद्‍रुपता असते. ती खरी तद्‍रुपता असते असं नाही. ह्याच्यामध्ये कृपा करुन कोणी घोटाळा करुन घेऊ नये. मला एक चित्रपट आठवतो. एक नवरा बायको "रोमिओ -ज्यूलियट" नाटकामध्ये काम करत असतात. आपल्याला तो "रोमिओ - ज्युलियट" मधला प्रसंग माहित आहे की ज्युलियट मरुन पडलेली आहे आणि रोमिओ तिच्याजवळ शेवटचं भाषण म्हणत असतो. आणि तो रोमिओ भाषण म्हणत असताना तिथे लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत असा शॉट. आणि शॉट चटकन कट केला आहे. आणि ती मृत ज्युलियट पडल्या पडल्या त्या रोमिओला म्हणते. "नाटकाच्या अगोदर कांदा खाऊ नकोस हे शंभर वेळा सांगितलं होतं तुला !" कारण तो इतका जवळ आला होता की तिला त्या कांद्याची घाण येत होती. पण लोक रडत होते कारण त्यांनी तो भास बरोबर निर्माण केलेला होता. हे खोटं नाहिये हा अभिनयाचा भाग आहे. म्हणून नाटकातलं खरं आणि नाटकातलं खोटं हे आपण पारखून घ्यायला पाहिजे.

संगीत नाटक आल्यानंतर आमचे बरेचसे समीक्षक - हे संगीतातले औरंगझेब होते - ते सगळे म्हणाले की संगीताने नाटकाचा गोंधळ केला. अहो, संगीताने काय गोंधळ केला ? हे म्हणजे फुलाने पूजेचा गोंधळ केला म्हणण्यासारखे आहे. संगीत ही काय गोंधळ निर्माण करणारी विद्या आहे ? ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील, पण तो दोष संगीताचा नाहिये. संगीताने कसा गोंधळ केला ? ह्या लोकांना आपली परंपरा किती मोठी आहे याची कल्पना नाही. मला एक महान समीक्षक म्हणाले, "काय तुम्ही बालगंधर्व सांगता ? ते ’कशी या त्यजू पदाला’ गाणं चालू असायचं आणि त्यावेळेला तो सिंधूचा बाप मख्खासारखा तिकडे उभा !" मी म्हटलं "अहो साहेब, सगळं ऑडियन्स 'कशी या त्यजू पदाला' म्हणत असलेल्या बालगंधर्वांकडे पहात असताना तुम्ही तिच्या बापाकडे कशाला बघत बसलात ? म्हणजे नाटकात काय पहावं हे सुध्दा आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का ?" त्यांना हे कळलं नाही की ज्या वेळेला गद्य शब्दांची शक्ती संपते त्या वेळेला गाणं सुरु होतं - त्यावेळेला कविता सुरु होते. अशी कल्पना करा की ज्या वेळेला आईला वात्सल्याचं भरतं येतं आणि मुलाला भरवायचं असतं त्या वेळेला "हा एक नंबरचा चमचा घे - आता दुसर्‍या नंबरचा चमचा घे - हे दूध घे - त्याच्यामधे हे मिक्स कर" असं म्हणत नाही ती. "घास घे रे तान्ह्या बाळा" असंच ती गाण्यामध्ये म्हणत असते. कारण तिला जे म्हणायचं आहे ते सुरांच्या मदतीशिवाय म्हणता येत नाही. आणि ही परंपरा किती जुनी आहे. अशी कल्पना करा की महाभारतातला नाट्यमय प्रसंग आहे. कर्णाचं चाक जमिनीत रुतलेलं आहे आणि कर्ण अर्जुनाला सांगतोय की "अरे, मला येवढं चाक उध्दरु दे". आता हे जर का त्या कीर्तनकाराने गद्यात सांगितलं असतं की "हे अर्जुना, मला हे चाक जरा उध्दरु दे, मग मी तुझ्याशी काय बोलायचं ते बोलतो आणि आपलं काय ठरवायचं ते ठरवू - निगोशिएशन्स वगैरे". अशाने काही परिणाम झाला नसता. तो कीर्तनकार सांगतो की कर्णाचं चाक तिथे रुततंय आणि कर्ण म्हणतो "रथचक्र उध्दरु दे" असा त्याने स्वर लावल्याबरोबर कर्ण कसा म्हणाला असेल ते डोळ्यासमोर उभं राहतं. तो काही टिवल्या-बावल्या करणारा मनुष्य नव्हता किंवा अर्जुनाला "टाईम-प्लीज" घालणारा नव्हता. "रथचक्र उध्दरु दे श्रुति शास्त्रज्ञा महारथा कुलजा" असं दण दण दण झालं की ताबडतोब तो कर्ण दिसायला लागतो, अर्जुन दिसायला लागतो, ती माणसं "लार्जर दॅन लाईफ" म्हणतात तशी होतात. हे कर्तृत्व गाण्यामधे असतं. "ते आले - त्यांना मी प्रथम पाहिलं" हे सगळं पाहिल्यानंतर तिला जे काही वाटलं ते "नाथ हा माझा मोहिखला" असं तिने गाण्यातच म्हणायला पाहिजे असं माझं मत आहे. गद्यामधे ती शक्ती नाही. तुम्ही "मानापमान" मधला "नाही मी बोलत नाथा" हा प्रसंग घ्या. "तू शालू नेसत असतानाच चांगली दिसत होतीस" असं धैर्यधराने म्हटल्यानंतर भामिनी म्हणते "मी कुलीन आहे. तुम्ही हे असं बोलणं बरं दिसत नाही. काहीतरी बोलू नका!" आता "काहीतरी बोलू नका" याचा खरा अर्थ "काहीतरी बोला" असा असतो. बायका ज्यावेळेला हे असं नकारार्थी बोलतात त्यावेळेला व्याकरणाच्या दृष्टीकोनातून त्याच्याकडे बघायचं नसतं. स्वीकरणाच्या दृष्टीने बघायचं असतं. त्यामुळे एखाद्या बाईने "चला" असं म्हटलं की उठून जायचं नसतं - बसायचं असतं. समीक्षकांना हे कळणार नाही. गाण्यामधे बालगंधर्व "नाही मी बोलत" हे किती तर्‍हेने सांगत असत. ज्यांना गाणं कळत नसे असल्या मूर्ख लोकांनी त्याला दळण घालणं असं म्हटलेलं आहे. त्यांना कळलंच नाही हो ते. आता बघावं कसं हेच कळलेलं नाही अशा माणसांच्या मताला काय करणार आपण ?

इथे आता साक्षात लयसम्राट बसलेले आहेत. त्यांना विचारा की नारायणराव बालगंधर्वांची साथ करताना मी मी म्हणणार्‍या तबलजींचे बखोटे कसे दुखून येत असत. कारण लयीतल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणाची जाणीव बालगंधर्वांच्या गाण्यामध्ये असे. तिरखवाँ खाँसाहेबांसारखा तबलजी उगीचच त्या गाण्यामधे रमला नाही. एकदा ते "नाही मी बोलत नाथा" सुरु झालं की ते "नाही मी बोलत" पन्नास वेळा म्हटलेलं नसे तर पन्नास तर्‍हेनी ते सजीव होऊन आलेलं असे. एखादी स्त्री किती तर्‍हेने "नाही" म्हणेल हे बालगंधर्व दाखवत असत. आणि असं दाखवण्याला आपल्या नृत्यातली केवढी परंपरा आहे. "मोहे चुनरी लाल रंगवा दो" - "मला लाल रंगाची चुनरी रंगवून दे" ह्याच्यावरचा भाव व्यक्त करायचा असेल तर तर आमचे नर्तक रात्र रात्र या एका ओळीवर भाव व्यक्त करत असतात. एकासारखा दुसरा नाही - दुसर्‍यासारखा तिसरा नाही. त्याची ही परंपरा आहे. हे ज्याला माहिती आहे त्याला "नाही मी बोलत नाथा"ची काय गंमत आहे ते कळेल. ज्याला ते कळलं नाही त्याला काय कळणार ? नारायणरावांना तुम्ही कसं पाहिलंत, नारायणरावांना तुम्ही कसं स्वीकारलंत याला खरं महत्व आहे. नाहीतर आमच्या गावचे सरपंच होते. त्यांना कृष्ण-गोपी वगैरे असलेला "श्यामसुंदर" सिनेमा दाखवायला नेलं होतं. सगळा सिनेमा पाहिल्यावर त्यांना विचारलं की "कसं काय वाटलं?" ते म्हणाले की "झ्याक हाय, पन त्यातला त्यो बैल कुनाचा रं ?" आता सगळा "श्यामसुंदर" सिनेमा पाहून त्या सरपंचाला त्यातला फक्त तो दणदणीत बैल आठवला. तसं आमच्या लोकांना बालगंधर्वांच्या गाण्यामधे दळण दिसायला लागलं याला काय म्हणायचं ? कर्म आपलं !

प्रत्येक पद बालगंधर्वांनी किती विचाराने म्हटलेलं आहे हा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनाच कळेल. म्हणूनच तुम्हाला सांगतो की त्यावेळेला बालगंधर्व नुसते स्टेजवरती "मी त्यांना प्रथम पाहिलं" म्हणत आल्यानंतर "मी पाहिल्या"नंतरचा आनंद कोंदून कसा येतो याचं उदाहरण लोकांना तिथे बघायला मिळत होतं. "नारायणराव बालगंधर्वांनी काय दिलं?" असं जर कोणी विचारत असेल तर जीवनामधे "सौंदर्य" हे मूल्य आहे हे नारायणरावांनी महाराष्ट्रामधे ठसवलं असं माझं मत आहे. सुबकपणाने जगणं - चांगल्या रीतीने जगणं - सुंदर तर्‍हेने गाणं - ते सुंदर तर्‍हेने मांडणं - आणि हे केवळ अगदी सहज घडलंय अशा तर्‍हेने मांडणं - काहीही सिध्द करण्यासाठी नाही - हे बालगंधर्वांनी दाखवलं. खूप वर्ष नाना कारणांनी मला त्यांची नाटकं बघायला मिळाली, त्यामुळे गप्पागोष्टींचाही काही वेळा योग आला. त्यावेळेला बालगंधर्वांचं फार मोठं वैशिष्ट्य लक्षात आलं की ते काहीही सिध्द करण्यासाठी गात नव्हते. म्हणजे आमचं जयपूर घराणं आहे - आमचं किराणा घराणं आहे - आमचं आग्रा घराणं आहे असं काहीही नव्हतं. ते फक्त गात होते. "सुगंध अथवा दुर्गंध - फुलास फुलण्याचा छंद" असं जे म्हटलंय ना, तसंच गाणं येत होतं आणि गाणं गात होते. आता बघा मी अशा ताना घेऊन दाखवतो - आता बघा हे खटके येत आहेत - आता हे बेहेलावे येत आहेत - असलं त्यांनी काहीही केलं नाही. ते फक्त गात बसले. प्रत्येक गाण्याच्या अर्थाला, शब्दाला धरुन - अक्षरा अक्षराला धरुन - नव्हे त्याच्यामधल्या लयीला धरुन बालगंधर्वांनी गाणी म्हटलेली आहेत.

आता आपलं सुदैव की ह्याच्यामध्ये फार मोठ्या लोकांची त्यांना साथ मिळाली. नुसता गुरु चांगला असून चालत नाही. गुरु आणि शिष्य दोन्ही चांगले लागतात. नुसत्या कृष्णाने गीता सांगितली असती तर ती इतकी पॉप्युलर झाली नसती. अर्जुनासारखा शिष्य त्याला मिळाला. विचारणारा अर्जुन लागतो तेंव्हा भगवंतांना जोर येतो. नाहीतर माझ्यासारखा विद्यार्थी जेंव्हा गणित शिकायला जायचा तेंव्हा "ह्याला गणित शिकवणं हे किती जन्मांचं पाप आहे" असं मास्तरांना वाटायचं. तसं नाही. तिथे गुरु आणि शिष्य दोघेही जमलेले होते. तुम्ही कल्पना करा की या रंगभूमीला जे नाटककार म्हणून लाभले ते आमचं केवढं भाग्य ? खाडिलकरांच्यासारखे - तात्यासाहेब केळकरांच्यासारखे - देवलांसारखे - सावरकरांसारखे - म्हणजे सामाजिक कार्यात जे दिग्गज होते ते आम्हाला नाटककार म्हणून लाभले. आणि ज्यांच्या नुसत्या नावाच्या उच्चाराबरोबर अखिल भारतीय अभिजात संगीतातले मोठे मोठे खाँसाहेब कान पकडत होते असे भास्करबुवा बखल्यांसारखे गवई हे आम्हाला गाण्यांचे संगीत दिग्दर्शक म्हणून लाभले. त्यांना आपण "संगीत दिग्दर्शक" आहोत हे माहित सुध्दा नव्हतं. त्यांच्यापुढे ही मंडळी बसायची आणि सांगायची असा असा प्रसंग आहे - आम्हाला गाणं द्या. मग ते सांगायचे की "ही चाल घ्या" - असं ते सगळं चालायचं. आणि भास्करबुवांनी जे शिकवलं ते फार डोळसपणे शिकवलं. असं समजू नका की भास्करबुवांनी बालगंधर्वांना आणि मास्तर कृष्णरावांना शिकवलं म्हणजे शिकवणीच्या मास्तरासारखे येऊन बसायचे आणि करा सुरुवात दळायला - असं नव्हतं. उत्तम शिक्षक कुठला की घेणारं पात्र काय लायकीचं आहे हे ज्याला कळतं तो. सब घोडे बारा टक्के असं आता शिकवावं लागतं, त्याला आता ईलाज नाही. परंतु गुरु-शिष्य परंपरेमध्ये शिष्यसुध्दा निवडून घ्यायचा असतो. गुरुलासुध्दा वाटलं पाहिजे की ह्याला दिलं तर चालेल. संगीताची विद्यालयं झाल्यामुळे काही फायदे झाले असतील, पण एक नुकसान झालं म्हणजे ज्याला दहा रुपये फी भरता येते त्याला गाण्याच्या क्लासमधे पाठवला. त्याला गाण्याची आवड - प्रतिभा आहे की नाही हा विचार बाजूला पडला. भास्करबुवांनी बालगंधर्वांना आणि मास्तर कृष्णरावांना असं दोघांनाही शिकवलं. एकदा भास्करबुवा "नाथ हा माझा मोहिखला" शिकवत होते आणि त्या दिवशी त्यांनी मास्तर कृष्णरावांना दुसरी चीज दिलेली होती. तालीम संपल्यावर भास्करबुवा गेले असं समजून बालगंधर्वांनी मास्तरांना दिलेल्या चीजेचा रियाज सुरु केला. कारण त्यांना ती चीज फार आवडली होती. खाली उतरलेले भास्करबुवा पुन्हा जिन्याने वर आले आणि म्हणाले "अरे नारायणा, तुझ्यापासून लपवून ठेवावी म्हणून का तुला ही चीज दिलेली नाही ? तू नाटकातल्या गाण्यामधेच मोठा होणार आहेस. त्या नाटकात कसं गावं असंच गाणं तुला दिलंय. ह्या मास्तराला काही वर्षात नाटकात काही भवितव्य नाही. ह्याला गवई म्हणून जगायचं आहे, म्हणून त्याला गवयाचं गाणं देतो". म्हणजे गवयाचं गाणं कुठलं आणि नटाचं कुठलं याची त्यांना उत्तम जाण होती. कारण ते स्वत: उत्तम नट होते.

भास्करबुवा संगीतामध्ये जातीभेद न मानणारे होते. आता यांच्या गुरुचीच आठवण आजच्या प्रसंगी निघाली आहे म्हणून सांगतो की भास्करबुवा गाण्यामधे किती जातीभेद मानत नसावेत ? एकदा एका होळीला मुंबईला कुंटे बिल्डिंगमधे गाणं होतं. त्या दिवशी कुंटे बिल्डिंगच्या मालकांनी लावणी गाणार्‍या बाईलाही बोलावलं होतं. तर तिचं गाणं चालू असताना भास्करबुवा तिथे पोचले. कुणी तरी विचारलं "बुवा, वर येता ना?" भास्करबुवा म्हणाले "नको, मी गेल्यावर येवढा मोठा गवई आला म्हटल्यावर तिच्यावर दडपण येईल. तिचं गाणं झाल्यावर वर जाऊ या". तिचं गाणं झाल्यावर गेले तर त्या बाईने त्यांना नमस्कार केला. भास्करबुवा म्हणाले "बस. हे बघ, तुझं गाणं मी मघापासून ऐकलं. आता माझं गाणं मी तुला ऐकवणार आहे आणि येवढंच नव्हे तर लावणी कशी गावी हेही गाऊन दाखवणार आहे. आणि भास्करबुवांनी त्या दिवशी त्या क्लासिकल बैठकीमध्ये "पंचकल्याणी घोडा - अबलख वारु" ही प्रसिध्द लावणी गाऊन दाखवली. त्याची दम-खम कशी, त्याचं चलन कसं - त्याचं वळण कसं हे सगळं दाखवलं. ही गोष्ट मी पुण्याला भास्करबुवांच्या पुतळ्याच्या उदघाटनाला सांगितली त्या प्रसंगाला मास्तर कृष्णराव हजर होते. तेंव्हा ते म्हणाले "पी. एल. देशपांड्यांनी सांगितलं ते खरं आहे, पण त्याच्यातला एक तपशील चुकला आहे. त्या दिवशी मागे तंबोर्‍यावर मी होतो हे सांगायचं ते विसरले" तर असं मानणारे लोक बालगंधर्वांना गुरु म्हणून मिळाले.

तुम्हाला सांगतो, "जे कर जोडुनी मजपुढे नाचले यादवांचे थवे" हे म्हणताना श्रोत्यांना "नाचले थवे यादवांचे" डोळ्यासमोर दिसत होते. आता असं वाटत असताना "गाण्याने नाटक थांबवलं" याला काय म्हणायचं हे कळत नाही. त्या नाटकातलं प्रत्येक गाणं नाटक पुढे नेणारं होतं. फक्त पाहणारा आणि ऐकणारा मनुष्य तिथे पाहिजे होता तो बालगंधर्वांनी कुठुन जन्माला घालायचा ? पण तो त्यांना मिळाला. त्यांच्या सुदैवाने महाराष्ट्राचं एक मोठं कौतुक जर कुठलं करायचं असेल तर बालगंधर्व काय करतात हे समजण्याची अक्कल असलेली माणसं गेली पन्नास वर्षे या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली हे एक आपलं मोठं भाग्य आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे.

एकदा मी बालगंधर्वांशी बोलत असताना विचारलं "नाना, तुम्ही स्वरावर पटकन कसे येता?" कारण तुम्ही बघा, त्यांचं "कशी या त्यजू पदाला" हे गाणं सुरु व्हायचं असेल तेंव्हा "हे चरण जिथे असतील तोच माझा स्वर्ग - तोच माझा कैलास -आणि तोच माझा वैकुंठ बरं, तोच माझा वैकुंठ" असं म्हटल्याबरोब्बर "कशी या त्यजू पदाला" सुरु व्हायचं. "तोच माझा वैकुंठ बरं, तोच माझा वैकुंठ" नंतर "आ SSSSSS" वगैरे स्वर लावणं काही नाही. म्हणजे त्या गाण्याचा सूर ऑर्गनवर लागलेला असो वा नसो - तो इतका भिनलेला होता की त्या सुरातच ते सुरु व्हायचं. थिरकवांसारखे लोक उगीच नाही वेडे झाले हो. एक फार लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. मला तो अनुभव फार महत्वाचा वाटतो. मला स्वत:ला आलेला अनुभव आहे म्हणून सांगतो की लोकांना वाटायचं की शिष्यत्व भावनेने किंवा फक्त भक्तीने ते होत होतं. असं नाही. अहो, तानेला उठावण घेतली तर कुठल्या सूक्ष्म क्षणातून निघाली त्याचा पत्ता लागायचा नाही. असं गाताना फार बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मी त्यांना विचारलं होतं की "तुम्ही स्वरावर पटकन कसे येता?" तेंव्हा बालगंधर्व म्हणाले "एक लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्या गाण्याची सुरुवात अगोदरच्या कुठल्या संवादाने होते हे बघायला पाहिजे" खाडिलकरांची नाटकं ज्यांनी नीट पाहिली असतील त्यांना खाडिलकरांचं एक मोठं वैशिष्ट्य लक्षात येईल की खाडिलकर संवादातून क्लायमॅक्ससारखे गाण्यावर कोसळायचे. म्हणजे मघाशी मी कीर्तनकाराचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे जे गद्यात सांगता येत नाही ते पद्यात सांगायचं. "मम मनी कृष्ण सखा रमला" हे तसं गाणं आहे. देवलांच्या संवादामधे ते येत होतं तसाच हा एक निराळ्या प्रकारचा संवाद आहे असं म्हणायला पाहिजे. त्या दिवशी बोलताना बालगंधर्वांनी "स्वयंवरा"तला एक पॅसेज मला म्हणून दाखवला. मला अजून आठवतंय - गलितगात्र अवस्थेत ते बसलेले होते. ते म्हणाले "जी चांगली बहिण नाही ती चांगली बायको होणार नाही. जी चांगली कन्या असत नाही ती चांगली बायको होणार नाही. त्यांना असं समजलं की मी बाबांचं मन दुखावलं, त्यांना जर असं समजलं की आईच्या डोळ्यातून मी अश्रूधारा काढल्या - त्यांना जर समजलं की कुंडिणपुरच्या वंशच्छेदाला मी कारणीभूत झाले तर माझा स्वीकार ते कसा करतील?" आणि त्यांनी लगेच "स्वकुल तारक सुता" सुरु केलं. म्हणजे "जी चांगली बहिण असत नाही" तिथपासून ती लय त्या "स्वकुल तारक सुता" मध्ये आली. त्याला ते "अगोदरचा स्टॉप" म्हणायचे. त्या पॅराग्राफपासूनच ते सुरु व्हायचं. असं प्रत्येक नाटकामध्ये होतं. खाडिलकरांनीसुध्दा पुष्कळ ठिकाणी हा स्कोप ठेवलेला आहे. "द्रौपदी" नाटकात सुध्दा असंच एक गाणं फार सुंदर रीतीने सुरु होतं. बालगंधर्व बोलताना गद्य आणि पद्य याच्या सीमारेषेवर बोलायचे. म्हणजे आपले कवी मुक्तछंदात जसं वाचतात की नाही -
हिमालयाहुनी आहे त्यांच्या हृदयाचा पर्वत
आणि जयांची प्रवृत्तीगंगा गोठली त्यांच्या मानसातच
न जाणे पहात वाट कोणत्या भगीरथाची
हे जसं छंदोमय गद्य आहे तसंच बालगंधर्व बोलत असत. तर त्या द्रौपदी नाटकात ती द्रौपदी विदुराशी बोलताना म्हणते "पांडवांच्या चरित्राची नदी ही कृष्णाच्या चरित्रात मिळून एकजीव झाली आहे. श्रीकृष्णाचं जे पुण्य तेच आमचं पुण्य. श्रीकृष्णाचे जे स्नेही तेच आमचे स्नेही. श्रीकृष्णाची कीर्ती ऐकून ज्यांना आनंद वाटतो त्यांनाच आमचंही वैभव पाहून सुखच होतं. श्रीकृष्णाला आमच्यातून निराळा काढून पाहू नका" असं म्हटल्याबरोबर "का?" असा प्रश्न तुम्हाला पडण्याआधी "विराट ज्ञानी" सुरु झालेलं असायचं. आणि "विराट ज्ञानी" म्हटल्यानंतर तिरखवाँ साहेबांचा जो तुकडा जायचा ना त्याच्याबरोबर प्रेक्षकांच्या मनात "कोंदटला" हा भाव दाटून येत असे. अशा रीतीने ते रसायन एकत्र आलेलं होतं. अशा रीतीने एक प्रकारचा उत्सव चालत असे.

आणि खरं सांगायचं झालं तर भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने नाटक हा एक उत्सवच आहे. ते एक रिच्युअलच आहे. तुम्ही पहा - आपली सुरुवातीची पूजा, नांदी हे एक रिच्युअल आहे. त्या भावनेने हे लोक करायचे आणि त्यामुळे एखादं रिच्युअल करताना - पूजा करताना त्यामधे आपल्याला तडजोड चालत नाही. जरी आपण "सर्वार्थे अक्षताम समर्पयामी" म्हणत असलो तरी ते खरं नाही. शंकराला बेलाचं पान पाहिजे म्हणजे बेलाचंच पान पाहिजे. तिथे दुसरं कुठलं त्रिदल असलेलं चालायचं नाही. त्याच्यात कॉम्प्रोमाईज नाही. म्हणून बालगंधर्वांनी कॉम्प्रोमाईज केलं नाही. मग प्रेक्षक असो किंवा नसो. असाच एका नाटकाचा प्रयोग होता आणि ऑडियन्स नव्हतं. तेंव्हा कृष्णराव चोणकरांनी आपलं एक पद दोन मिनिटांत आटोपलं आणि आत आले. आत आल्यानंतर बालगंधर्व कृष्णरावांना म्हणाले "कृष्णराव, इतक्या लवकर पद आटोपलंत?" कृष्णराव म्हणाले "काय करायचं, आज ऑडियन्सच नाही" त्यावर बालगंधर्व म्हणाले "अहो, दहा लोक आले होते, त्यातला एकाला ऐकायची इच्छा असेल तर ?" मी नेहेमी संपूर्ण समर्पण म्हणतो ना ते हे आहे. अहो, बालगंधर्वांनी उगाचच ढोंगाने "अन्नदाते - मायबाप" असं म्हटलेलं नाहिये. त्यांना खरोखरच तसं वाटत होतं. पण त्याच्याबरोबर त्यांना हेही माहित होतं की ते ज्या भक्तिभावाने "अन्नदाते - मायबाप" म्हणत त्याच भक्तिभावाने त्यांचा श्रोतासुध्दा त्यांना "आनंददाते - मायबाप" म्हणत होता. एवढा आनंद त्यांनी दिला. तुम्ही कल्पना करा की आणखी इतर कोणाची जन्मशताब्दी साजरी करायची असेल तर हाके घालून मंडळी जमवावी लागतात. इथे आपण सहज स्फूर्तीने आलो आहोत. इथे काही सत्ता वगैरे आहे का ? काही नाही. यांच्या हातात प्रेमाची सत्ता आहे. ह्यांनी कुठली जमीन वगैरे बळकावली नाही तर मनोभूमी बळकावली. आणि मनोभूमी बळकावायला कोणतीही शस्त्र वगैरे लागत नाहीत तर प्रेमाशिवाय ती बळकावता येत नाही. ते प्रेम या माणसाने आपल्याला उदंड दिलं म्हणून कृतज्ञतेपोटी आपण इथे जमतो. आता जर का कोणी विचारलं की "नारायणरावांनी तुम्हाला काय दिलं?" आम्हाला काय दिलं की आनंद दिला, दुसरं काय सांगणार ? आमचे एक फायदावाले मित्र आहेत. त्यांचा प्रत्येक गोष्टीत "ह्याचा काय फायदा?" असा विचार असतो. आम्ही पुण्याला बालगंधर्व थिएटर बांधत होतो तेंव्हा हे आले. त्यावेळेला कुठेली पेठ हे आपल्याला सांगायला नको. त्यांचा पोस्टल ऍड्रेस आपल्या लगेच लक्षात येईल. ते म्हणाले "पी एल, तुम्ही हे काय चालवलंय? आता हे बालगंधर्व थिएटर उभं करत आहात !" मी म्हटलं "अहो, थिएटर उभं राहिलं तर काही चुकलं का?" "काय फायदा?" मी म्हटलं "अहो, तिथे नाटकं होतील ...." "काय फायदा?" मी म्हटलं "अहो, तिथे गाणी होतील ...." "काय फायदा?" मी म्हटलं "अहो, असं बघा, त्या सारस बागेत सुंदर फुलांची बाग केली आहे, खूप फुलं फुलतात, काय फायदा? इथे ह्या बालगंधर्व थिएटरच्या बाहेर झाशीच्या लक्ष्मीबाईचा अश्वारुढ पुतळा आहे, त्याचा तो लोखंडी घोडा टांग्यालासुध्दा जोडता येत नाही - काय फायदा ?" मी त्यांना विचारलं "आपलं वय काय?" "पंचाहत्तरावं चालू आहे!" मी म्हणालो "काय फायदा?" तेंव्हा हा प्रश्न जे विचारतात त्यांना आपल्याकडे उत्तर नाही. बालगंधर्वांनी हा उदंड आनंद आपल्याला दिला.

पण एक मात्र सांगतो की बालगंधर्वांची गाणी गायची तर बालगंधर्वांची गाण्यातली वृत्ती काय होती याचा आधी अभ्यास केला पाहिजे. मी कोणाला इम्प्रेस करण्यासाठी गातो म्हटलं तर इम्प्रेस होणारच नाही. संगीतामधे "नजर" असा एक शब्द आहे. सुराची सुध्दा नजर असावी लागते. सूर सुध्द्दा डोळ्यासमोर दिसावा लागतो. एकदा एक तरुण गवई गात होता. तानाबिना जोरदार चालल्या होत्या. गळासुध्दा तरबेज होता. तेंव्हा त्याच्यासमोर बसलेले उस्ताद अब्दुलकरीम खाँसाहेब त्याला म्हणाले "जरा थांब ! तू पूरिया गातो आहेस. आधी पूरियाची मूर्ती तयार कर. मग त्याला जे अलंकार घालायचे असतील ते घाल. अगोदर फुलंच उधळीत बसलेला आहेस पण आत मूर्तीच नाही. करायचं काय ? " बालगंधर्व त्या गीताची जी भावना असेल ती पहिल्या दोन ओळीतच दाखवत असत. आणि खाडिलकरांचं कौतुक करायला हवं. त्यांच्या गाण्याची तोंडंच सुंदर असायची. पुढे क्लिष्ट असायचं. "रणगगन सदना" याचा अर्थ मंडळी अजून लावत आहेत. ते जाऊ दे. पण त्या "रणगगन सदना"चं दुसरं सांगतो की जे म्युझिकली फार महत्वाचं आहे. कारण तो जो दणदणाट करुन जातो तो नुसत्या अक्षरांनी व्यक्त केला आहे. "रणगगन सदना" झालं की तो काहीतरी भडकलेला आहे येवढंच कळायचं, अर्थ कशाला कळायला हवा ? शिवीचा काय अर्थ कळावा लागतो? तो संताप कळल्याशी कारण. "नयने लाजवीत" किंवा "यदुमनी सदना" सारखं गाणं -ही जी सगळी गाणी आहेत त्यांची तोंडं इतकी सुंदर होती, ते म्हटलं रे म्हटलं की लोकांना हे नाटक आपल्याला आणखी काहीतरी सांगतंय असं वाटायचं.

पुष्कळांनी संगीत नाटकांवर असाही आरोप केलेला आहे की नाटक तिथे थांबायचं आणि गवई गात बसायचे. आणि दुसरा असा आरोप की वास्तवात कोण कोणी गातो का ? आता हा वास्तव हा शब्द भयंकर शब्द आहे. तो कुठे वापरावा हे पुष्कळ लोकांना कळत नाही. नाटक हेच मुळी अंतरंगातली वास्तवता घेऊन येत असतं. बहिरंगातली नाही. नाटक बहिरंगातली वास्तवता घेईलच कसं? लोकांना तिकिट घेऊन आत यावं लागतं - पडदा वर जातो - लाईटस असतात - प्रॉम्प्टर असतो - भाषण चुकल्यावर प्रॉम्प्टर पुन्हा सांगतो - शिवाजी महाराजांच्या मिशा सुध्दा मेकअपच्या खोट्या असतात तिथे आपली काय स्थिती ? नाटक हे खोटंच असतं. परंतु ते खोटं नाटक आपलं जीवन किती खरं आहे ते सांगत असतं. तसं त्या नाटकातलं गाणं कृत्रिम बित्रीम काही नसतं. हा त्या नाटकाचाच भाग असतो. आपण लंगडीचा खेळ खेळतो ना ? चांगले दोन पाय असून आपण एका पायावर कशाला धावतो ? ते आरोप म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यासारखं आहे. अहो, तो खेळच तसा आहे की त्याच्यामधे एका पायावरच धावायचं असतं. तसं त्या संदर्भाला धरुन गायचं असतं. त्यावेळेला नाटक मागे थांबतं. नट एक पाऊल पुढे येऊन गातो, गाणं संपून वातावरण छान झालं की परत मागे येतो. आणि नाटकाचा प्रवास परत सुरु होतो. एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा डेक्कन क्वीन सारखा एक स्टेशन घेतलं आणि पुढे चाललं असा नसतो. हा नाटकाचा प्रवास म्हणजे एका सुंदर उद्यानाचा प्रवास आहे. त्यातल्या सुंदर सुंदर जागा दाखवत दाखवत नाटककाराने आणि नटांनी प्रेक्षकाला भरतवाक्यापर्यंत न्यायचं असतं. नाहीतर सगळं रामायणसुध्दा चार ओळीत सांगता येतं. एक राम होता - त्याचं लग्न झालं - रावणाने त्याची बायको पळवली - रामाने रावणाला मारलं आणि बायकोला सोडवून आणली - संपलं रामायण ! पण त्याच्यासाठी आपण टेलिव्हिजनवर छप्पन भाग पहातो आहोत (तरीही राम म्हणत नाही). म्हणून गाणं हा नाटकातला अंतर्भूत भागच आहे. आणि भारतीय संस्कृतीचं सगळ्यात कुठलं वैशिष्ट्य असेल तर आम्ही संगीताला सगळ्यात मोठं स्थान दिलेलं आहे. जिथे आमचं तत्वज्ञान प्रवर्तक भाग आहे त्या महाभारतातल्या तत्वज्ञाच्या चर्चेला आपण "गीता" म्हणतो. गायलं गेलेलं तत्वज्ञान आहे ते. उपनिषदांसारखं ते गद्य नाही तर गीतं आहेत ती. गाण्याशिवाय आपला एक तरी व्यवहार होतो का ? लग्न लागताना मंगलाष्टकं सुरु होतात (अलिकडच्या चाली सोडून द्या - त्या ऐकताना लग्न लागलंय असं वाटण्याऐवजी लग्न मोडलंय असं वाटतं) इतक्या त्या मंगलाष्टकाच्या चाली रुजलेल्या आहेत. हे गाणं आम्ही रंगभूमीवर आणलं कारण आमचं जे जीवन आहे त्याचा सगळा खेळ आम्ही तिथे लोकांना दाखवतो. आणि आम्ही त्याला "क्रतू" म्हणजे यज्ञ म्हटलेलं आहे. ज्याच्यामधे सगळा आनंद आहे असा साधा नाही तर चांगला मोठा यज्ञ आहे तो. त्याच्यामधे हे सगळे कलावंत येतात - आपापले आविर्भाव घालतात - गाणारा गाणं देतो -अभिनेता अभिनय देतो - नेपथ्यकार नेपथ्य देतो - आणि मग त्याच्यातून ती यज्ञदेवता उभी रहाते. बालगंधर्वांच्या बाबतीमधे रंगभूमीवरचा त्यांचा प्रवेश हेच "वरंब्रूही" म्हणत यज्ञदेवता प्रसन्न झाली की काय अशा प्रकारचा प्रवेश होता. खाडिलकर वगैरे नाटककार असे पक्के होते की ती एंट्री लोकांची उत्सुकता बरोब्बर वाढवत वाढवत होत असे. मानापमानात ती भामिनी आतूनच सांगते की "मी साफ सांगते, मी मुळीच येणार नाही!" हे ऐकल्यावर इथे नऊ आण्यात बसलेल्या आम्हा लोकांच्या काळजात धस्स व्हायचं हो! बालगंधर्व आले नाही तर काय घ्या ! अशी उत्सुकता वाढवत वाढवत काचकन ते आले की वाटायचं की यज्ञीय देवताच आली.

बालगंधर्वांच्या त्या सौंदर्याला सीमाच नाही. एक पुरुष, स्त्रीत्वातलं जे काही महत्वाचं आहे - जे जे काही सुंदर आहे, मधुर आहे ते सगळं आपल्या अभिनयाने दाखवतो आणि एक नाही, दोन नाही तर पाच पाच पिढ्या वार्धक्यातसुध्दा त्यांचा तो अभिनय बघतात. माझा एक मित्र मला म्हणाला की "म्हातारपणात तू गंधर्व काय बघतोस?" मी म्हणालो "अरे, ते बघण्याच्या दृष्टीवर आहे. मी ज्यावेळेला रायगडावर जातो त्या वेळेला मला शिवाजीमहाराजांचं ते सिंहासन भग्नावस्थेत दिसत नाही. मला तिथे महाराज बसलेले दिसतात. कारण अगोदर माझ्या मनाच्या डोळ्यांनी मी ते सिंहासन भरलेलं पाहिलेलं आहे. तिथे हुजरे, भालदार, चोपदार उभे आहेत हे पाहिलेलं आहे. हे पाहण्याची ज्याला शक्ती आहे त्याला बालगंधर्व म्हातारे दिसले नाहीत. बालगंधर्व हे त्याला खिडकीसारखे दिसले. त्याच्या पलिकडून ते सर्व नाटक दिसत होतं. नाही तर तुम्ही भग्न मूर्ती बघालच कशाला ? कैलासलेणी बघायला गेल्यानंतर हात तुटलेला असतो, पण तुम्हाला खरं सांगतो, त्या तुटलेल्या हाताच्या ठिकाणी तुम्ही नीट पाहिलंत की तो सबंध हात आपल्याला नीट दिसायला लागतो. ह्या हातांनी त्या हाताचं हातपण सिध्द केलेलं असतं. आपल्या सरकारी खात्यातले लोक त्या मोडलेल्या मूर्ती दुरुस्त करायला निघाले आहेत. काय तुम्हाला सांगू? हे शिल्पकाराने केलंय का एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनने केलंय असं वाटावं अशा प्रकारची तिथे अवस्था आहे. ऑर्थोपेडिक सर्जन कसे तुम्ही लंगडलंच पाहिजे असा हेतू मनात बाळगून ऑपरेशन करत असतात तसं ते दिसतं. म्हणजे माणसाने एकाच पायावर उभं रहावं अशी त्यांची काहीतरी इच्छा असावी. असो. त्यांच्याविरुध्द बोलायचं मला काही कारण नाही. तसं ते बालगंधर्वांचं जे भग्न रुप होतं त्याच्यामधे तुम्हाला बालगंधर्व दिसलेच कसे नाहीत ? हे पाहण्याची तुम्हाला दृष्टी पाहिजे.

बालागंधर्वांना पंचाहत्तरावं वर्ष लागलं हा काही बालगंधर्वांचा दोष नाही. पंचाहत्तरावं वर्ष कोणालाही लागतं, त्याला काय करणार ? ज्याला पंचाहत्तरावं वर्ष लागतं त्याला ते सहन करावं लागतं. तुम्ही षष्ठ्यब्दी वगैरे जेंव्हा साजरी करता तेंव्हा मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की मला साठावं वर्ष लागावं म्हणून तुम्ही काहीही केलेलं नाही - ते निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये लागलेलं असतं - त्याची पुन्हा पुन्हा आठवण कशाला करुन देता ? तर असं ते बालगंधर्वांचं वार्धक्य नव्हतं. अहो, बालगंधर्वांचं म्हातारपणातलं गाणं आम्ही ऐकत नाही म्हणणार्‍या लोकांना काय सांगावं ? मी खरोखरच सांगतो, लय म्हातारी झालेली आहे का ? "अवघाची संसार"ची उठावण म्हातारी झालेली आहे काय ? ह्या "यदुमनी सदना" ची गोष्ट सांगतो. कोल्हापूरला संगीत समारोह होता. माझे कोल्हापूरचे मित्र आज इथे आलेले आहेत ते याची खात्री पटवतील. थकलेल्या वयामध्ये बालगंधर्व गात होते. तिरखवाँ खाँसाहेब तबल्याला होते आणि "यदुमनी सदना"सुरु केलं. "यदुमनी सदना" सुरु केल्यावर कोणाची तरी चिठ्ठी आली की रुपक तालामधे काहीतरी ऐकवा. कारण त्याला "मम सुखाची ठेव" ऐकायचं होतं. तर बालगंधर्व ती चिठ्ठी वाचत असताना खांसाहेबांनी विचारलं "क्या है?" बालगंधर्व म्हणाले "ये साब रुपक सुनना चाहते है" खाँसाहेब म्हणाले "इसीको रुपक बना दो". आता यदुमनी सदना चा सोळा मात्रांचा ताल आणि रुपक सात मात्रांचा. सात आणि सोळाचं मी सुध्दा गणित करु शकणार नाही. पण बालगंधर्वांनी ते बरोबर रुपक तालात म्हटलं. जगन्नाथबुवा पुरोहितांसारख्यांनी "तुम्हीच हे करु शकता" असं म्हणून स्टेजवरच त्यांचे पाय धरले. आणि इतकं करणार्‍या माणसाला त्याचं व्याकरण विचारा - त्याला माहित नव्हतं ! अहो, तुकारामाने काव्यशास्त्र वाचलं नव्हतं हे आपल्यावर केवढे उपकार आहेत ? बालगंधर्वांनी मात्रांचा हिशेब असा बोटावर केला नाही तर अंत:करणाच्या ठोक्यावर घातला. तिथे तो ताल बरोबर वाजायचा. तिथला ताल कसा उचलून नेणार ?

मला आठवतंय, पुण्याला गाणं होतं. आणि "मधुमधुरा तवगिरा" बैठकीत सुरु झालं. तबल्याला बाबालाल होते. चांगले तबलजी. त्यांनी निराळ्याच प्रकारचा अध्धा धरलेला होता. तो तसा ठुमरीला धरतात. बालगंधर्वांना सारखं वाटत होतं की हा ठेका नाही. पण तो कुठला ठेका धरा - त्या ठेक्याचं नाव कुठे माहित होतं ? मग अनंता लिमये ऑर्गनवर होता त्याला बोलावलं आणि म्हणाले "अनंता, बाप्पा, आपल्या कंपनीत जो ठेका धरतात ना तो धरायला सांग" मी समोर बसून हे सगळं ऐकत होतो. मग अनंताने बाबालालना सांगितलं की असा ठेका पाहिजे. तो ठेका धरल्याबरोबर परत गाणं सुरु. आणि म्हणूनच संगीताच्या शास्त्राच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रमाद आहेत ना, ते प्रचंड गुण ठरले हो ! कारण ते प्रमाद सहज घडले. आता मुलं काय किंवा मुली काय, गात असताना बालगंधर्व शुध्द निषाद लावत होते म्हणून भीमपलासामधे शुध्द निषाद आता लावतोय बरं का - लावतोय बरं का - असं सांगत सांगत लावतात आणि त्या शुध्द निषादाचा काहीच परिणाम होत नाही. बालगंधर्वांचा शुध्द निषाद कधी लागून गेला कळतही नसे आणि अल्लादियाखाँसाहेबांची दाद कधी गेली हेही कळत नसे. असा प्रकार झाला पाहिजे. दुसर्‍या कोणी जर भीमपलासात तो शुध्द निषाद लावला असता तर त्या काळातल्या संगीताच्या रखवालदारांनी त्या गवयाची जीभ कापली असती. बालगंधर्वांना भीमपलासातले वादी स्वर कोणते, संवादी स्वर कोणते काहीही माहित नव्हतं. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांना - तुकारामांना - नामदेवांना शिल्पकला काही कळत नव्हती, पण त्यांना विठ्ठल कळत होता. तो पाहिल्यानंतर हाच विठ्ठल असं म्हणायचे. त्याचप्रमाणे बालगंधर्व हाच भीमपलास, हीच बागेश्री, हाच मांड असं म्हणायचे. आणि बालगंधर्व गायले तरी काय ? फार मोठे राग गायलेच नाहीत. छोटे छोटे, साधे साधे राग गायले. त्याचं कारण असं की अमका मुश्किल राग गाऊन आता इथे करामत करुन दाखवतो असं त्यांना म्हणायचंच नव्हतं.

माझ्या आयुष्यामध्ये गायला बसल्यावर नुसतं गात राहिली अशी मी दोन माणसं पाहिली. एक बेगम अख्तर आणि दुसरे बालगंधर्व. बेगम अख्तरसुध्दा गायला लागल्यानंतर काही इंप्रेशन टाकणं वगैरे काही नाही - गात गेल्या आणि ते गाणं होत गेलं. ही दोघं गात असताना गाणं जन्माला येत आहे असं वाटायचं इतकी त्यात सहजता होती. आणि असं वर्षानुवर्ष करत असताना त्यात कधीही कुचराई केली नाही. प्रत्येक गोष्ट करताना ती त्याच दर्जाची झाली पाहिजे याबद्दलचा आग्रह बालगंधर्वांनी शेवटपर्यंत धरला. तुम्ही कंपनीत ठेवलेली माणसंच बघा. साथीला दिग्गज म्हणावे असे लोक होते. बालगंधर्वांची साथ केली ही "आपल्या आयुष्याची धन्यता झाली’ असं वाटावं अशी माणसं होती. तिरखवाँ खाँसाहेब काही कमी नव्हते. तपस्वी मनुष्य होता. वयाच्या ८० व्या वर्षी आबासाहेब मुजुमदारांकडे तबला वाजवला. रात्री चांदणे पडले होते, तर म्हणाले "चलो मिया, जरा टेहलते टेहलते जायेंगे !" मग आम्ही हिंडत हिंडत निघालो. मी त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हणालो " खाँसाहेब, क्या खूब बजाया आपने" खाँसाहेब म्हणाले "अभी अभी त्रितालेका अंदाजा आ रहा है!" ८० वं वर्ष झालं होतं, पण म्हणत होते आत्ता कुठे त्रितालाचा अंदाज येतो आहे. तुम्हाला माहिती आहे का, ज्ञान त्यालाच आलेलं आहे की की आपल्या हातात काही सापडलं नाही याची जाणीव ज्याला झाली तो माणूस ज्ञानी झाला. बालगंधर्वांना त्याची जाण झालेली होती. त्यामुळे गाताना मी ह्या परंपरेने गातो असं त्यांचं काहीही नव्हतं. अहो, लहान मुलासारखं गाणं ऐकायचे. माझी पेटी नाहीतर त्यांनी कशाला ऐकली असती ? "सत्यवदे वचनाला" त्यांना आम्ही वाजवून दाखवायचं ? अक्कलच नव्हती आम्हाला. तर इतक्या प्रेमाने ते गाणं ऐकायचे. जितक्या प्रेमाने ऐकायचे तितक्याच प्रेमाने लोकांच्या विषयी कृतज्ञता भाव बाळगून गायचे. "मायबाप आलेले आहेत - त्यांना ऐकवलं पाहिजे" हा भाव होता.

हे मघाशी म्हणाले की त्यांना उचलून आणलं. म्हणजे तशा अवस्थेमध्ये सुध्दा ते आले ते आपलं दैन्य दाखवायला आले नाहीत, तर माझं गाणं अजून संपलेलं नाही हे दाखवायला आले. मी त्यांना अत्यंत विकलांग अवस्थेत भेटलो असताना - हे सांगताना मला इतकं दु:ख होतंय- ते डोळ्यापुढे नवीन नाटक मंडळी कशी उभी करायची - नाटक मंडळींचं बिर्‍हाड कसं पाहिजे याची स्वप्न पहात होते. किंबहुना असली वेडी स्वप्न जे लोक पहातात ना, तेच अशा आदराला प्राप्त होतात. हिशेबाने वागणारी माणसं ही कधीही अशा आदराला प्राप्त होणार नाहीत. त्यांना हिशेब बरोबर जमतो पण आदराचं खातं मात्र रिकामंच रहातं. ह्या माणसाने आयुष्यामध्ये वेडेपणा पुष्कळ केला. पण तो कशासाठी केला? जिथे निष्ठेने आपलं सगळं आयुष्य वाहिलेलं होतं त्या रंगदेवतेसाठी केला. हजार हजार रुपयांचे शालू वगैरे घेतले असं लोक सांगतात. आपल्याकडे हजार रुपयांचा शालू आहे हे दाखवण्यासाठी नव्हता तो घेतला. तो शालू नारायण श्रीपाद राजहंसांसाठी नव्हताच. तो शालू रुक्मिणीचा होता. रुक्मिणी जर भीष्मकाची मुलगी आहे तर (मी आता इकडल्या मिलचं नाव घेत नाही) कुठल्यातरी मिलच्या साड्या तिला का नेसवायच्या ? ती रुक्मिणीची साडी वाटली पाहिजे. याच्यासाठी माझ्याजवळ हजार रुपये असोत वा नसोत. मी तसला शालू नेसून दाखवीन. का? तर ही रुक्मिणी आहे हे पुढे जमलेले जे अन्नदाते आहेत त्यांना वाटलं पाहिजे. यासाठी हा सगळा अट्टाहास शेवटपर्यंत केला.

ते शंभर दिवस बेशुध्दावस्थेत होते. त्यावेळी जर कुणाला दिव्य कान लाभला असता तर त्याच्यातून "रंगभूमीसाठी काहीतरी करायला पाहिजे" येवढंच ऐकायला आलं असतं. कारण गातानासुध्दा ते अशा तन्मयतेने गायचे की असा रंध्रारंध्रातून गाणारा गवई मी पाहिला नाही. एकदा ते "अवघाची संसार" गात होते. मी आणि भीमसेन जोशी शेजारी बसलो होतो. भीमसेन झटकन म्हणाला की "भाई, अशी तन्मयता आणि असा षड्ज लागलेला ऐकला की वाटतं की आपल्या तंबोर्‍याच्या भोपळ्याची भाजी करावी" हे भीमसेनसारख्या मोठ्या माणसाला वाटलं. बालगंधर्वांची खोटी तारीफ करुन आम्हाला काहीही मिळवायचं नव्हतं. ते कुठल्याही सत्तेवर नव्हते - मंत्री नव्हते - उपमंत्री नव्हते - को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्षसुध्दा नव्हते की काही कर्ज वगैरे मिळेल. काहीही नव्हतं. आम्हाला त्यांच्या पावत्याच देता आलेल्या नाहीत. आज मी मघापासून बोलतोय ते फक्त "इये हृदयीचे ते हृदयी घातले" याच प्रेमाने बोलतोय. कारण तुम्ही सगळे त्याच प्रेमाने एकत्र आलेले आहात. अशा प्रेमाने जमलेल्या मंडळींपुढे बोलताना भान रहात नाही. धुंडिराज म्हणतो "ही माझी मालती. घनश्याम, आता मात्र मी बोलणार" असं ज्या प्रेमाने बोलतो त्या प्रेमाने इतका वेळ मी बोललो. तुम्हीही इतका वेळ बसून ऐकून घेतलंत. हा विषय संपणाराच नाहिये, कारण त्याचा कंटाळाच येणार नाही. चांदण्याचा कधी कंटाळा येणार नाही - गंगेच्या ओघाचा कधी कंटाळा येणार नाही - गुलाबाच्या फुलाचा कधी कंटाळा येणार नाही - कोणाचं सुंदर सुभग दर्शन झालं तर त्याचा कंटाळा येणार नाही. हे सगळं जिथे साठलेलं आहे अशा बालगंधर्वांविषयी बोलताना कंटाळा कसा येईल ? वल्लभाचार्यांच्या स्तोत्रातला एक श्लोक मला नेहेमी आठवतो. त्यांनी म्हटलं आहे

रुपं मधुरं, गीतं मधुरं, वचनं मधुरं, वसनं मधुरं
नयनं मधुरं, हसितं मधुरं, चलितं मधुरं, वलितं मधुरं
मधुराधिपते अखिलं मधुरं

जे पहावं ते सुंदर आहे. "चंदनाचे हात, पायही चंदन" असं जे म्हटलेलं आहे ना तसंच बलगंधर्वांचं होतं. बालगंधर्वांनी नुसता हात जरी पुढे केला तरी त्या हाताकडे बघतंच रहावं असं वाटायचं. ग. दि. माडगूळकर शेवटी हताशपणे म्हणाले "असा बालगंधर्व आता न होणे!" ह्यातली ओळनओळ खरी आहे असं म्हणण्याचं भाग्य ज्या कलावंताला लाभलं त्याचा आपण शंभरावा जन्मोत्सव साजरा केला.

बालगंधर्व महाराष्ट्रातले आहेत याचं आपल्याला विशेष महत्व वाटतं. आपल्या भाषेतली नाटकं करणारे होते. आपल्याला आनंद दिला, आपल्या वडिलांना - आजोबांना आनंद दिला, त्यांची गाणी आपल्या नातवंडानाही आनंद देतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेला मला इथे येऊन बालगंधर्वांचं संकीर्तन करायचा योग लाभला त्याबद्दल माझा मित्र वसंत आगाशेचा मी आभारी आहे. तो माझ्याबद्दल पुष्कळ प्रेमाने बोलला. त्यातला प्रेमाचा भाग तेवढा लक्षात घ्या -अतिशयोक्तीचा विसरुन जा असं मी आपल्याला सांगतो. फार प्रेमाने बोलला. हा सगळा उत्सव त्या प्रेमाचा उत्सव आहे. मघाशी कुणीतरी सूचना केली की बालगंधर्वांच्या नावाने तीन दिवसांचा उत्सव करावा. मी तीन दिवसांचा उत्सव साजरा करावा असं म्हणणार नाही. तुमच्या पुढल्या आयुष्यामध्ये बालगंधर्वांचा उत्सव साजरा होतो आहे अशा वातावरणातच आपलं पुढलं आयुष्य जाऊ दे अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो.


या दुव्यावर आपल्याला बालगंधर्वांच्या गायकीचा आस्वाद घेता येईल